
महड वरदविनायक गणपती मंदिर देवस्थानने स्वच्छतागृह सेवेसाठी भक्तांकडून पाच रुपये शुल्क आकारणी सुरू केली होती. याबाबत भाविकांनी नाराजी व्यक्त करताच याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेने आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने यू टर्न घेतले असून स्वच्छतागृहाची सेवा पुन्हा निःशुल्क केली आहे. त्यामुळे वरदविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची लूट थांबली आहे.
अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायकाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. पूर्वी या ठिकाणी स्वच्छतागृह निःशुल्क होते, परंतु मंदिर देवस्थानने या सेवेसाठी पाच रुपये आकारणी सुरू केली होती. याबाबत अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त करत शुल्क आकारणी बंद करावी अशी मागणी केली होती, परंतु त्याकडे कानाडोळा केला जात होता. याबाबत शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे, सरचिटणीस जितेंद्र सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिव आरोग्य सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. परेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मंदिर संस्थान महडचे व्यवस्थापक बडगुजर यांना निवेदन देत आंदोलनचा इशारा दिला होता. यावेळी शिवसेना खालापूर शहरप्रमुख संभाजी पाटील, शिव आरोग्य सेना खोपोली शहर समन्वयक सचिन पाटील, विभाग समन्वयक हेमंत काणेकर, विभाग संघटक विलास पाटील, अनिल पवार उपस्थित होते.



























































