
सरकारचे मदतीचे पॅकेज हे फसवे असून, त्यातून शेतकऱयांची फसवणूक होत असल्याचा आरोप शिवसेना पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज घोषित केले असले, तरी प्रत्यक्षात अर्थसंकल्पीय तरतूद पंधरा हजार कोटी रुपयांच्या पुढे नाही, त्यामुळे या पॅकेजची शेतकऱयांना त्याची विगतवारी कशी करणार? असा सवाल सरकारला केला.
अतिवृष्टीमुळे शेतकऱयांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भातील प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आजपर्यंत शेतकऱयांना घोषित केलेली पॅकेजेस प्रत्यक्षात किती मिळाली? ही पॅकेज फसवी असतात. त्यातून शेतकऱयांची फसवणूक करण्याचा उद्योग केला जात आहे. असे सांगून भास्कर जाधव म्हणाले, शेती पिकांचे नुकसान पाहण्यासाठी केंद्राचे पथक आले. ते रात्री शेतात गेले आणि पहाटे निघून गेले. राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले, तर केंद्रीय मंत्री म्हणतात, आम्हाला प्रस्ताव मिळालाच नाही. अशा पद्धतीने शेतकऱयांची फसवणूक करू नका. संकटातून शेतकरी उभा करा. कोकणात दुबार पेरणी होऊ शकत नाही. त्यामुळे कोकणातील शेतकऱयांना मदत झाली पाहिजे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन त्याचे स्वरूपदेखील जाहीर करावे, अशी मागणी जाधव यांनी केली.
वलसाडला हापूस दर्जा नको!
कोकणातल्या हापूस आंब्याला ‘जीआय’ मानांकन काढून वलसाड आंब्याला हापूसचा दर्जा देण्याचा घाट घातला आहे. कर्नाटकचा आंबा हापूसची बदनामी करत आहे. तर, दुसरीकडे वलसाडला ‘हापूस’ हा शब्द देण्याचा प्रयत्न होत आहे. असे सांगून भास्कर जाधव म्हणाले, ‘गुजरातला काय द्यायचे ते द्या, वाटलं तर तुम्ही तिथ जाऊन राहा; परंतु वलसाडला ‘हापूस’चा दर्जा देऊ नका.

























































