परळमध्ये शिवसेनेकडून ‘होऊ द्या चर्चा’चे आयोजन, सर्वसामान्य राजकारणाच्या अधःपतनावर विचारणार प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना शाखा क्रमांक 204 आयोजित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार मुंबई महापालिका प्रशासनाने सुशोभीकरणाच्या आणि रस्ते सिमेंट क्राँक्रिटीकरणाच्या नावाखाली केलेला भ्रष्टाचार, मुंबई महापालिकेच्या 92 हजार कोटींच्या मुदत ठेवींची लूट आणि सध्या राजकारणाचे झालेले अधःपतन या विषयावर शिवसेनेकडून ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, 22 ऑगस्टला संध्याकाळी 6.30 वाजता बेस्ट वसाहत, परळ, शुक्रवार 25 ऑगस्टला दत्ताराम लाड मार्ग, शनिवार 26 ऑगस्टला आंबेवाडी, सोमवार 4 सप्टेंबरला मेघवाडी येथे याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील मिंधे सरकारकडून विविध प्रकल्प आणि योजनांमध्ये विकासाच्या नावाखाली होत असलेली लूट सर्वसामान्यांनाही खटकत आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड संतापाची भावना आहे. या संतापाच्या भावनेला वाट करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परळ येथे होणाऱया कार्यक्रमात शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना विधिमंडळ गटनेते, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपनेत्या, महिला विभाग संघटिका किशोरी पेडणेकर, माजी आमदार दगडू सकपाळ, विधानसभा संघटक सुधीर साळवी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रभाग क्र 204 मधील सर्व सोसायटी सभासद, शिवसैनिक आणि सर्वसामान्यांनी उपस्थित राहून आपले प्रश्न विचारावेत, असे आवाहन माजी नगरसेवक अनिल कोकीळ, शाखाप्रमुख किरण तावडे, शाखा संघटक कांचन घाणेकर, युवा शाखा अधिकारी सुजय गुरव यांच्याकडून करण्यात आले आहे.