गीतकार प्रकाश पवार यांच्या मदतीला शिवसेना धावली, आर्थिक सहाय्य देतानाच पक्क्या घरासाठीही प्रयत्न करणार

एकापेक्षा एक गाणी लिहून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गीतकार प्रकाश पवार यांच्या मदतीला शिवसेना धावली आहे. तातडीची मदत म्हणून त्यांना अकरा हजार रुपये देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देण्यात आली. शिवसेनेच्या या मायेच्या आधाराने प्रकाश पवार यांना अक्षरश: गहिवरून आले.

कसारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे 15 बाय 10 च्या एका पडक्या घरात कवी प्रकाश पवार राहतात. दोन अपत्य असलेल्या पवार यांचा मोठा मुलगा कवी देवदत्त पवार व सुनेचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले, तर लहान मुलगा बिगारी काम करून कुटुंबास हातभार लावतो. घरातील लहानमोठे असे एकूण आठ जणांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न 74 वर्षीय पवार यांच्या समोर आहे. तुटलेल्या कारव्याच्या भिंती, गळके छप्पर अशा विदारक परिस्थतीचा सामना करणाऱ्या पवार यांची कैफियत दैनिक ‘सामना’ने मांडली. चार हजार गाण्यांच्या गीतकाराच्या नशिबी फाटकी झोपडी या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे व अन्य शिवसैनिकांनी पवार यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आस्थेने विचारपूस केली. तसेच तातडीची मदत म्हणून 11 हजारांचे सहाय्य केले.

नातवंडांच्या शिक्षणाचा खर्च उचलला

प्रकाश पवार यांच्या दिवंगत मुलाच्या मुलीचा शिक्षणाचा खर्च शिवसेना करणार आहे. तसेच घरासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू, असे संतोष शिंदे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे रघुनाथ कदम, संतोष खैर, संतोष लहाने, दिनेश कांबळे, शंकर भगत, कृष्णा धोगडे, जयराम बेंडकुळे व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्धव साहेबच गरीबांचे तारणहार

शिवसेनेच्या मदतीने प्रकाश पवार भारावून गेले. कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी मख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच गरीबांचे खरे तारणहार आहेत. आमच्यासारख्या गरीब कलावंतांकडे आपण लक्ष द्याल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या