जानेवारीत मुख्यमंत्री बाद होणारच, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मुंबई तसेच नवी मुंबईत महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले प्रकल्प पूर्ण झाले तरी मिंधे सरकारकडून त्यांची उद्घाटने करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, वरळी-शिवडी कनेक्टर, कोस्टल रोडचे उद्घाटन जानेवारीपर्यंत होईल असा दावा शिंदे यांनी केला होता. त्यावर जानेवारीपर्यंत घटनाबाह्य मिंधे मुख्यमंत्रीच बाद होणार आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

युवासेनेकडून गोरेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वेट ऑन स्ट्रीट कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. त्याचप्रमाणे शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ओपन जिमचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

दिल्लीच्या वाऱयांतून वेळ मिळाला तर शेतकऱयांकडे पाहतील

शेतकऱयांच्या मुद्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला कर्जमुक्ती मिळाली होती, पण नव्या मुख्यमंत्र्यांनी काहीच दिले नाही असे शेतकरी म्हणत आहेत. मुख्यमंत्र्यांना गुजरात आणि दिल्लीच्या वाऱया करून वेळ मिळाला तर ते राज्यातील शेतकऱयांकडे पाहतील, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

कोणी ट्रक्टर पाण्यात नेऊन बीच सफाई करतो का?

मुंबईत बीच सफाई मोहिमेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोवरून आदित्य ठाकरे यांनी यावेळी खिल्ली उडवली. ‘कोणी ट्रक्टर पाण्यात नेऊन बीच सफाई करतो का? त्यांनी पोज देण्याआधी मला फोन करून बीच सफाई कशी करतात हे विचारायला हवे होते. मी सांगितले असते. उगीच ट्रक्टर पाण्यात नेऊन स्वतŠचे हसे करून घेतले’, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ज्यांची भीती वाटते त्यांची भाजप आणि मिंधे बदनामी करतात

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मिंधे आणि भाजपच्या आरोपांना सणसणीत उत्तर दिले. केवळ आपल्या बदनामीसाठी सरकारचे कारस्थान आहे, सरकारला ज्यांची भीती वाटते त्यांना बदनाम केले जाते, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी आज मिंधे सरकारवर हल्ला चढवला. विरोधकांना बदनाम करण्यासाठी सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.