
महायुती सरकार केवळ आश्वासने देते, दिखावा करते पण अंमलबजावणी काहीच करत नाही. त्यामुळे महायुती सरकार…क्या हुआ तेरा वादा? असा सवाल मुंबईकर करत आहेत, अशा शब्दांत शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत सरकारचे वाभाडे काढले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना वरुण सरदेसाई यांनी सरकारच्या फसवेपणावर सोदाहरण टीका केली. सरकारने दावोसला जाऊन करार केले त्याबद्दल राज्यपालांच्या भाषणात भाष्य आहे. पण फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आम्ही त्यांचे दावोसमधले बर्फातले फोटो पाहतोय आणि प्रत्येक वेळी करारांच्या आकड्यासमोर एक शून्य वाढलेला असतो. 2014 पासून जेवढे एमओयू झाले त्याचे काय झाले? किती कंपन्या उभ्या राहिल्या आणि किती जणांना नोकऱ्या मिळाल्या, असा सवाल सरदेसाई यांनी केला.
शेतीसाठी एआयचा वापर करणार म्हणून सांगितले. महाराष्ट्रातल्या चार कृषी विद्यापीठांमध्ये शिकवायला प्राध्यापक नाहीत म्हणून एआयचा वापर करणार का? समृद्धी महामार्ग पालघरपर्यंत जाणार हे ठीक आहे, पण त्यातून कुणाची समृद्धी होणार? मुंबई-पुणे महामार्गही आता एक्स्प्रेस महामार्ग राहिलेला नाही इतके ट्रफिक असते, असे आमदार सरदेसाई म्हणाले.
ज्यांनी सत्ता दिली त्यांना न्याय कधी?
मुंबईतील पोलिसांना घरे देऊ. वांद्रे येथील शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासासाठी भूखंड देऊ असे सरकारने सांगितले, पण अद्याप दिलेला नाही. मुंबईतील झोपड्या, चाळी, वस्त्यांचा पुनर्विकास कधी होणार? लहान मुलांना, ज्येष्ठांना प्रदूषणाचा त्रास होतोय. पण सरकार काहीच करत नाही, असे सरदेसाई म्हणाले. ज्यांनी सत्ता दिली त्याला तरी सरकार न्याय देणार का? असे सरदेसाई म्हणाले.






























































