
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी 23 जानेवारी रोजी नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यव्यापी महाशिबीर होत आहे. याच दिवशी सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱया खुल्या अधिवेशनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेते व युवासेना पदाधिकाऱयांची नाशिकमधील पदाधिकाऱयांबरोबर बैठक पार पडली. महाशिबीर स्थळाची पाहणी करून नियोजनाबाबत सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.
सातपूर येथील हॉटेल डेमोक्रॉसी येथे 23 जानेवारी रोजी दुपारपर्यंत महाशिबीर होणार आहे. सायंकाळी नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हरे मैदानावर खुले अधिवेशन होणार असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनासाठी हॉटेल एक्प्रेस इनमध्ये रविवारी बैठक पार पडली. शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, शिवसेना सचिव सुप्रदा फातर्पेकर यांनी महाशिबीर व खुल्या अधिवेशनाच्या निमित्ताने होणाऱया जाहीर सभेच्या नियोजनाबाबत सूचना दिल्या, मार्गदर्शन केले. यानंतर या सर्वांनी सातपूरच्या हॉटेल डेमोक्रॉसी येथे भेट दिली. तेथे महाशिबिराच्या ठिकाणाची पाहणी केली. बैठक घेवून नियोजनाबाबत चर्चा केली. यावेळी उपनेते सुनील बागुल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत, विनायक पांडे, योगेश घोलप, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, राहुल दराडे, बाळासाहेब कोकणे, राहुल ताजनपुरे, बाळकृष्ण शिरसाट, योगेश गाडेकर, दीपक दातीर, शंभू बागुल, देवा जाधव, प्रेम पाटील, सुभाष गायधनी, नाना पाटील, वैभव ठाकरे, नीलेश साळुंखे, मसूद जिलानी, राजेंद्र देसाई, बाळा दराडे, मंदा दातीर, फैमिदा रंगरेज आदी हजर होते.
श्रीरामाच्या भूमीतून रणशिंग फुंकलं जावं
नाशिक या प्रभू श्रीरामाच्या भूमीतून लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेचे रणशिंग फुंकलं जावं, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे. त्यामुळे पंचवटीतूनच लढाईला सुरुवात होईल. सत्याचं युद्ध हे या भूमीतूनच व्हावं, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. 1994ला नाशिकमध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाले होते. ‘दार उघड बये दार उघड’ ही गर्जना इथूनच घुमली आणि शिवसेनेसाठी सत्तेचे दरवाजे उघडले, असेही ते म्हणाले.




























































