शिवसेनेचा मुख्यमंत्री हा रामलल्लाचा प्रसाद – संजय राऊत

1439
sanjay-raut-press-conferenc

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी एक दिवसाच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी अयोध्येत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत यांनी विविध प्रश्नांना उत्तर देताना ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला हा रामलल्लाचा प्रसाद मिळाला असं मानतो’, अशा शब्दात राऊत यांनी भावना मांडल्या.

याआधी दोन वेळा उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकदिवसीय दौऱ्याचे नियोजन कसे असेल हे देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत यांनी स्पष्ट केले की, ‘हा राजकीय दौरा नाही, हा आमच्या धार्मिक आस्थेचा भाग आहे. उद्धव ठाकरे यांचं आगमन महत्त्वाचं आहे. रामलल्लाच्या कृपेने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. हा आम्हाला मिळालेला प्रसाद आहे, असं आम्ही मानतो. उद्या उद्धव ठाकरे हे प्रथम लखनौला येतील. त्यानंतर ते अयोध्येला जातील, असंही राऊत यावेळी म्हणाले. ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे कुटुंब देखील असणार आहे. त्यातच आदित्य ठाकरे हे आता आमदार असून कॅबिनेट मंत्री आहेत. ते देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत रामललाचे दर्शन घेणार आहेत’, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. कोरोना व्हायरसमुळे केंद्राकडून सूचनावली ‘अॅडव्हायजरी’ देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे’, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काही संघटना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्य़ाला विरोध करणार असल्याचा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, ‘भाजपने कश्मीरमध्ये पीडीपीसोबत हातमिळवणी केली होती, म्हणून त्यांच्या दौऱ्याला कुणी विरोध केला का? ज्यांना विरोध करायचा त्यांना करू द्या. मंदिर कुणाच्या हक्काचे नाही. राममंदिर सर्वांचेच आहे. अन्य पक्षांमध्ये सुद्धा रामामध्ये आस्था असणारी मंडळी आहेत. त्यामुळे रामललाच्या दर्शनासाठी सर्वांनीच आले पाहिजे’, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या