जगात हिंदुहृदयसम्राट फक्त एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे! – उद्धव ठाकरे

देशातच नाही, तर जगात जगात हिंदुहृदयसम्राट फक्त एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. संतापजनक म्हणजे पक्ष, नाव चोरणारे आता ही उपाधीही चोरायला बघत आहेत. अशांना राजकारणात गाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत लोकं येत आहेत, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई, ठाणे, पालघरमधील शेकडो कार्यकर्त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भगवा झेंडा आपल्याला कायम ठेवायचा असून परत फडकवायचा आहे. लवकरच पालघर मतदारसंघाचा दौरा करणार असून जाहीर सभा घेणार आहे. जनतेला काय पाहिजे हे राज्यकर्त्यांना कळत नसेल तर जनतेचा आवाज त्यांच्या कानापर्यंत कसा पोहोचवायचा हे शिवसेनेला चांगलेच माहिती असल्याचे ते म्हणाले.

मी कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, वृत्तीविरोधात आहे. आपल्याला समोर दिसणारी हुकुमशाही आताच तोडूनमोडून टाकावी लागेल, नाही तर पुन्हा आपल्याला मान वर काढता येणार नाही. सर्वसामान्य माणूस कुणाचा तरी गुलाम बनून राहील. गुलामगिरी मला मान्य नाही आणि तुम्हालाही कुणाचा गुलाम होऊ देणार नाही, म्हणून मी लढायला उतरलो आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.