भाजपची पडझड सुरूच! मानखुर्द पोटनिवडणुकीत शिवसेनेचे लोकरे विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील राजकारणात भारतीय जनता पार्टीची पडझड सुरूच आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे पानिपत झाल्यानंतर विविध महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकीतही भाजपला हादरा बसला आहे. मुंबई, नाशिक आणि मालेगाव महापालिका पोटनिवडणूक, तळेगाव-दाभाडे नगरपरिषद पोटनिवडणूक आणि लांजा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. महाराष्ट्र विकास आघाडीने या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवले.

तळेगाव नगरपरिषदेतही भाजपला धक्का

पुणे जिह्यातील तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीतही भाजपाला महाराष्ट्र विकास आघाडीने धक्का दिला. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता. त्यासाठी तिथे पोटनिवडणुक घेण्यात आली होती. सुनील शेळके यांच्या काकी संगीता शेळके यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभे करून महाराष्ट्र विकास आघाडीने त्यांना पाठिंबा दिला होता. संगीता यांनी भाजपच्या कृष्णा म्हाळसकर यांचा 795 मतांनी पराभव केला.

चंद्रपुरातील नगरपरिषदेतही भाजपच्या पदरी निराशा

चंद्रपूर येथील गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीतही भाजपच्या पदरी निराशा पडली. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या सविता टेकाम या विजयी झाल्या. त्यांनी भाजपा उमेदवार रंजना मडावी यांचा दीड हजार मतांनी पराभव केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्ररित्या ही निवडणूक लढवली होती. नगरसेवक निकालात 17 जागांपैकी काँग्रेस 5, राष्ट्रवादी काँग्रेस 4, शिवसेना 5, भाजपा 2 आणि शेतकरी संघटना 1 अशी स्थिती आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

लांजा नगरपंचायतीवर फडकला भगवा, नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मनोहर बाईत

लांजा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून मनोहर बाईत यांच्यासह नऊ नगरसेवक विजयी करीत निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. लांजा नगर पंचायत निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या निवडणुकीत मनोहर बाईत यांनी मतांची आघाडी घेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार राजेश राणे यांचा 637 मतांनी पराभव केला. प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष होण्याचा मान बाईत यांना मिळाला. पूर्वा मुळे, लहू कांबळे, प्रसाद डोर्ले, सोनाली गुरव, वंदना काटगाळकर, यामिनी जोईल, स्वरूप गुरव, समृद्धी गुरव, सचिन डोंगरकर असे शिवसेनेचे नऊ उमेदवारही विजयी झाले.

नाशिक पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव, राष्ट्रवादीचे पवार विजयी

नाशिक महापालिकेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीत महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला धक्का बसला. महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार मधुकर जाधव आणि राष्ट्रवादीचे जगदीश पवार हे मोठय़ा फरकाने विजयी झाले.

सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 26 मधून महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार मधुकर जाधव हे 2 हजार 812 मताधिक्यांनी विजयी झाले. जाधव यांना 5 हजार 865, तर त्यांचे प्रतिस्पर्धी मनसेचे पराभूत उमेदवार दिलीप दातीर यांना 3 हजार 53 मते मिळाली. भाजपाचे कैलास अहिरे यांना अवघी 1 हजार 21 मते मिळाली. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक 22 मधून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार जगदीश पवार यांना 4 हजार 913 मते मिळाली, तर भाजपाच्या उमेदवार विशाखा शिरसाठ यांना 1 हजार 525 मते मिळाली.

लोकरेंनी केली 14 उमेदवारांची अनामत जप्त

मुंबई महानगरपालिकेच्या मानखुर्द प्रभाग क्रमांक 141 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे विठ्ठल लोकरे सर्वाधिक 4427 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भाजपच्या बबलू पांचाळ यांचा 1,385 मतांनी पराभव केला. पांचाळ यांना 3,042 मते मिळाली तर 14 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. या विजयानंतर मुंबई महापालिकेतील ताकद वाढली असून शिवसेनेचे संख्याबळ 95 झाले आहे.

मानखुर्दच्या एका जागेसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. अपक्ष उमेदवार खान तुफेल बरकतुल्ला यांना 1,787 मते, समाजवादी पक्षाचे खान जमिर भोले – 1,486, काँग्रेसचे उमेदवार 708 मते, रिपब्लिकन सेनेचे संबोधी कांबळे – 618, एमआयएमचे सद्दाम खान – 508 तर रिपाइंचे (आठवले गट) अमोल क्षीरसागर यांना 106 मते पडली. उर्वरित 10 अपक्ष उमेदवारांना 500 च्या आत तर त्यापैकी 8 अपक्षांना 50 च्या आत मते मिळाली तर चार राजकीय पक्ष व अपक्ष अशा 14 उमेदवारांना अपेक्षित मते न मिळाल्याने त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. 2017 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 141 मधून काँग्रेसच्या तिकिटावर विठ्ठल लोकरे निवडून आले होते. तीन महिन्यांपूर्वी लोकरे यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली होती.