
सामना प्रतिनिधी । सोलापूर
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद व त्यांच्या जनावरांसाठी चारा आणि गावासाठी पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम मंगळवार 12 फेब्रुवारी रोजी “सारोळे” या गावात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रात अन्नदाता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे म्हणजे महाराष्ट्रासाठी काळिमा फासणारी घटना आहे. जगाचा पोशींदा शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येकडे वळू नये आणि शेतकऱ्यांनी आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी “दुष्काळ गंभीर, शिवसेना खंबीर” असा नारा देत दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून येण्यासाठी दुष्काळी भागाचा दौरा हाती घेतला आहे. मोहोळ तालुक्यातील सारोळे गावात एखाद दुसरे जनावर असलेल्या अत्यंत गरजू शेतकऱ्यांची यादी संबंधित युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत मागविण्यात आली. त्यांना मंगळवारी सकाळी सारोळे गावात युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जनावरांसाठी चारा वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख वानकर यांनी सांगितले.

































































