जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत लढा देणार, पालिका कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेची आग्रही भूमिका

मुंबई महापालिकेत 5 मे 2008 नंतर नियुक्त झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना ‘जुनी पेन्शन योजना’ लागू करावी, यासाठी आपण अगोदरपासूनच आग्रही आहोत. तसेच राज्य सरकारच्या 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या निर्णयानुसार 5 मे 2008 पूर्वी भरतीप्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत समाविष्ट केलेच पाहिजे, जुन्या पेन्शन योजनेसाठीचा लढा शेवटपर्यंत दिला जाईल, असा निर्धार शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात खासदार अरविंद सावंत बोलत होते. त्यांनी 7 ऑक्टोबरला महापालिका आयुक्तांसोबत यशस्वी बैठक घडवून आणली. तसेच पालिका निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर परिपत्रक काढले जावे, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी खासदार सावंत यांचे आभार मानले.

मेळाव्यात एलएसजीडी व एलजीएस पदविका उत्तीर्ण कर्मचाऱ्यांची बंद केलेली वेतनवाढ सुरू करणे, वेतन विसंगती समितीचा अहवाल लागू करणे, प्रलंबित एएनएमचा जलद गतीने निपटारा करणे, तसेच दिवाळी बोनस आदी गोष्टींबाबत केलेल्या पाठपुराव्याबाबत उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच सरचिटणीस सत्यवान जावकर, कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन चिटणीस संजय वाघ यांनी केले. या वेळी उपाध्यक्षा रंजना नेवाळकर, सरचिटणीस अ‍ॅड. रचना अग्रवाल, चिटणीस हेमंत कदम, वृषाली परुळेकर, अजय राऊत, संदीप तांबे, अतुल केरकर, रामचंद्र लिंबारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.