सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास तयार झाल्यानंतर मिंधे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे. त्यावर शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी सोमवारी लेखी उत्तर सादर करीत तीव्र आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रखडवण्याचा मिंधे गटाचा डाव असल्याचा दावा चौधरी यांनी केला आहे.
न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी होणार आहे. याचदरम्यान अॅड. असीम सरोदे व अॅड. विनयकुमार खातू यांनी शिवसेनेतर्फे सोमवारी उत्तर सादर केले. मिंधे गटाने सात महिन्यांत सुनावणीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी निश्चित केल्यानंतर मिंधे गट जागा झाला आहे. उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रखडवणे ही मिंधे गटाची खेळी असल्याचा दावा अजय चौधरी यांनी केला आहे.
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांनाही पात्र ठरवत 10 जानेवारीला तसा निर्णय जाहीर केला. त्या निर्णयावर आक्षेप घेत गोगावले यांनी याचिका दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर नार्वेकर यांना याचिकेवर वेळीच उत्तर सादर करण्याची विनंती करण्याऐवजी मिंधे गटाने शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची विनंती केली आहे. यावर अजय चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.