सांस्कृतिक-सामाजिक संस्थांवर सवलतींचा वर्षाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाडेवाढ, अपुऱया सोयीसुविधा यावरून काही निर्मात्यांनी दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाटय़गृहात प्रयोग करणार नाही असा पवित्रा काही दिवसांपूर्वी घेतला. यावरून वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट)ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेनंतर संस्थेने प्रसिद्धीपत्रक काढून निर्मात्यांचा भाडेवाढीचा आरोप फेटाळला. भाडेदरात कशा सवलती दिल्या जातात, हे सांगतानाच शिवाजी मंदिर नाटय़गृहाची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले.

श्री शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत म्हणाले, नाटय़संस्थेने 500 रुपये तिकीट दर लावल्यास भाडे दुप्पट आकारले होते, ते मराठी नाटय़ व्यावसायिक निर्माता संघाच्या मागणीनुसार दीडपट करण्यात आले. तसेच संगीत व प्रायोगिक नाटकांच्या नाटय़गृह भाडय़ात 25 टक्के सवलत दिली आहे. ट्रस्टने घेतलेल्या निर्णयानुसार मार्च 2024 पासून शिवाजी मंदिर नाटय़गृह प्रायोगिक व हौशी नाटय़प्रयोगांसाठी सोमवार व गुरुवारी सायंकाळच्या सत्रात विनामूल्य दिले जाणार आहे.