शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कामत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई येथील डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कमलाकर कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी आज ही घोषणा केली. या आदेशाची प्रत आज सायंकाळी विद्यापीठ कार्यालयास प्राप्त झाली.

डॉ. रजनीश कामत हे शिवाजी विद्यापीठाचे 14वे कुलगुरू ठरले आहेत. डॉ. दिगंबर शिर्के यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकाकडेच कुलगुरूपदाचा पदभार आलेला आहे. डॉ. कामत हे शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे माजी प्रमुख असून, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या ते मुंबई येथील डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचाही अतिरिक्त कार्यभार आहे. डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी तसेच ते वयाच्या पासष्ट वर्षे पूर्ण करेपर्यंत असणार आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ 7 ऑक्टोबर 2025 रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ. कामत यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एस्सी. तसेच गोवा विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. डॉ. कामत यांच्या 211 संशोधनपत्रिका आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाल्या असून, त्यांची 16 पुस्तकेदेखील प्रकाशित झाली आहेत. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रांत व्यापक अनुभव आहे.

निवडीसाठी समितीची स्थापना

या निवडीसाठी राज्यपालांनी कोईम्बतूर येथील भारतीय विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख (निवृत्त) डॉ. पी. कंदास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठाचे (मध्य प्रदेश) माजी कुलगुरू प्रा. एन. सी. गौतम हे समितीवर प्रतिनिधी होते. इंदूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुहास जोशी आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. रजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली.