शिवनेरी सेवा मंडळ कबड्डी – मुंबईच्या शिवशक्तीला महिला राज्यस्तरीय कबड्डीचे जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवशक्ती महिला संघाने शिवनेरी सेवा मंडळ आयोजित स्थानिक महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. शिवशक्तीची पूजा यादव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिला रोख रु. पाच हजार (5,000-) व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने डॉ. शिरोडकरचा कडवा प्रतिकार 41-36 असा मोडून काढत स्व. भागीरथीबाई सावंत स्मृती चषक व रोख रु. पंचवीस हजार (25,000-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या शिरोडकरला स्व.सौ. सुवर्णा परब चषक व रोख रु. पंधरा हजार (15,000-) यावर समाधान मानावे लागले.

शिरोडकरच्या मेघा कदमने पहिल्याच चढाईत गुण घेत संघाचे खाते खोलले. त्यानंतर सलग आणखी 3 गुण घेत 4-0 अशी आघाडी घेतली. शिवशक्तीने मेघाची अव्वल पकड करीत 2 गुणांनी आपले खाते उघडले. रिया मडकईकरने चढाईत 2 गुण टिपत बरोबरी साधली. शिवशक्तीने लोण देत 10-04 अशी आघाडी घेतली, पण ती फार काळ टिकली नाही. शिरोडकरने त्यानंतर पूर्वार्धातच 2 लोण देत 22-13 अशी आघाडी घेतली.

उत्तरार्धात शिवशक्तीची पूजा चढाई करताना स्वयंचित (सेल्फ आऊट) झाली. त्याचवेळी शिरोडकरच्या 3 खेळाडू राखीव क्षेत्रात गेल्यामुळे बाद झाल्या. येथेच सामना त्यांच्या हातून निसटला. याचा फायदा घेत शिवशक्तीने लोणची परतफेड करीत आघाडी 22-25 अशी कमी करत आणली. शिवशक्तीच्या पूजाने बोनस करीत व गुण घेत 29-28 अशी आघाडी घेतली. शिरोडकरच्या मेघाने बोनससह 2 गडी टिपत संघाला पुन्हा आघाडीवर नेले. शेवटची 5 मिनिटे असताना 32-30 अशी शिरोडकरकडे आघाडी होती. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना शिवशक्तीने शिरोडकरवर आणखी एक लोण देत 38-32 अशी आघाडी घेतली आणि सामनाही आपल्या नावे केला. तसे पाहिले तर हा सामना मेघा कदम विरुद्ध पूजा यादव असाच झाला. शिवशक्तीकडून पूजाला चढाईत रिया मडकईकरची, तर पकडीत साक्षी रहाटे व साधना विश्वकर्मा यांची उत्तम साथ लाभली. शिरोडकरकडून मेघाला चढाईत कशीश पाटील, तर पकडीत साक्षी सावंत, श्रावणी घाडीगावकर यांची मोलाची साथ लाभली.

विशेष व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियमने महिंद्राचा चुरशीच्या लढतीत 31-28 असा पराभव करीत स्व. मोहन नाईक चषक व रोख रु. पंचवीस हजार (25,000/-) आपल्या नावे केला.