स्वाभिमानचे मच्छीमारांवरील प्रेम पुतना मावशीचे : हरी खोबरेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

सागरी हद्दीत मासेमारी करणारे एलईडी व पर्ससीनधारक हे स्वाभिमानचेच पदाधिकारी आहेत. निवडणुकीची जबाबदारी स्वाभिमानने याच पर्ससीन धारकांकडे दिली आहे. त्यामुळे स्वाभिमानची नेतेमंडळी पारंपरिक मच्छीमारांवर दाखवत असलेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे, अशी टीका शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमान मच्छीमारांच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पारंपरिक मच्छीमारांचे शिवसेनेशी घट्ट नाते असून मच्छिमार शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. असा विश्वास खोबरेकर यांनी व्यक्त केला.

शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, महेश देसाई, दीपक देसाई, स्वप्नील आचरेकर, नंदू गवंडी, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खोबरेकर म्हणाले, गेल्या पाच वर्षात पारंपरिक मच्छीमारांसाठी शिवसेनेने काय केले हे मच्छीमारांना माहीत आहे. याउलट स्वाभिमानच्या तालुकाध्यक्षांनी त्याच्या खासदारांनी गेल्या २५ वर्षात मच्छीमारांसाठी काय केले. माजी खासदारांनी मच्छीमारांसाठी किती प्रश्न उपस्थित केले हे सांगावे.

याउलट पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी संसदेत तर आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेत आवाज उठविला. स्वतंत्र मत्स्य खाते हे युती शासनाच्या काळातच झाले. पर्ससीन, पारंपरिक मच्छीमारांच्या वादासंदर्भात खासदार, आमदार, पालकमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर कायद्यात बदल करून पर्ससीनच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली. डॉ. सोमवंशी समितीचा अहवाल युती शासनाने स्वीकारत पर्ससीन मासेमारीवर निर्बंध आणले. एलईडीच्या विनाशकारी मासेमारीवर बंदी घालण्यात आली. येत्या काळात कायद्याची कडक अमंलबजावणी करून अनधिकृत परप्रांतीय मासेमारीवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास खोबरेकर यांनी व्यक्त केला. तर पालकमंत्र्यांनी दोन गस्ती नौका कारवाईसाठी उपलब्ध केल्या. चांदा ते बांदा योजनेंतर्गत बोटइंजिन, इन्सुलेटेड वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे अभ्यास करूनच केणी यांनी आरोप करावेत, असे बाबी जोगी यांनी सांगितले.

तर पर्ससीन-एलईडी धारकांची यादी देऊ
आचरा मच्छिमार राड्याच्या वेळी पर्ससीन धारकांना उघड समर्थन खासदार नारायण राणे यांनीच दिले होते. स्वाभिमानमध्ये प्रवेश केलेले आचरा येथील मुजावर हे पर्ससीन धारक आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमानने विभागाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पर्ससीन धारकांची पाठराखण कोण करत आहे हे दिसून येत आहे. स्वाभिमानाचे काही पदाधिकारी पर्ससीन एलईडी धारक आहेत. स्वाभिमान याबाबत अनभिज्ञ असल्यास त्यांना याची यादी देऊ, असा सूचक टोलाही खोबरेकर यांनी लगावला.

काँग्रेस की स्वाभिमान हे आधी जाहीर करावे
आमदार नितेश राणे व स्वाभिमान तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी आपण स्वाभिमानचे की काँग्रेसचे हे जाहीर करावे. नंतरच आपली भूमिका मांडावी. नाहक शिवसेनेवर आरोप करून मच्छिमारांच्या नावाने सुरू असलेले राजकारण थांबवावे. अन्यथा मच्छिमार व सुज्ञ जनता मतपेटीतून उत्तर देईल, असे उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी सांगितले.