कोणी मंत्रीपद गमावलं, कोणी तुरुंगात सडतंय… मग सावेंच्या ‘त्या’ मारकुट्या नगरसेवकाला संरक्षण का? अंबादास दानवेंचा संतप्त सवाल

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगात आले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी एका प्रकरणावरून भाजपवर कडाडून टीका केली आहे. मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस’ असलेल्या एका माजी नगरसेवकाच्या गुंडगिरीचा व्हिडीओ शेअर करत दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे.

अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मारहाण करणारा व्यक्ती हा मंत्री अतुल सावे यांच्या जवळचा असून तो एक माजी नगरसेवक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ शेअर करताना ते म्हणाले की, क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय… पण मंत्री अतुल सावे यांचा ‘खास माणूस’ असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

पुढे दानवे म्हणाले की, दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला?” ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची ‘भक्ती’ करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी, असे अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर ना देवभाऊ?” असे म्हणत थेट मुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.