विद्यार्थी-पदवीधरांसाठी शिवसेनेचा वचननामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेने वचननामा सादर केला. हॉटेल टिपटॉप प्लाझा येथील पत्रकार परिषदेत शिवसेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थी व पदवीधरांसाठी अनेक योजना असलेला हा वचननामा सादर केला.

निसर्गरम्य कोकणात पर्यटन व्यवसाय विकसित केला जाईल. त्यातून स्थानिक तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होईल. व्हर्च्युअल क्लासरूम, टॅब, डिजिटल स्कूल या माध्यमातून शहरी भागात शिवसेनेने शिक्षणाचा दर्जा उंचावला. या सर्व सुविधा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. रत्नागिरी उपकेंद्राचे रूपांतर पूर्ण विद्यापीठात करण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल. सागरी संशोधन संस्थांच्या माध्यमातून कोकणातील जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन व तरुणींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण हाच शिवसेनेचा अजेंडा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

केवळ दरबारी राजकारण करणारे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना आणि ते ज्या पक्षात पूर्वी काम करत होते त्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचा साफ विसर पडला आहे. वडिलांच्या जीवावर आमदारकीची मजल मारणाऱया निरंजन यांना भाजपमध्ये गेल्यावर वडिलांची आठवणही राहिली नाही. जो स्वार्थासाठी स्वतःच्या वडिलांना विसरला तो मतदारांना काय लक्षात ठेवणार, अशी जबरदस्त फटकेबाजी शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी केली. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाप्रमुख, ठाणे महापालिका सभागृह नेते नरेश म्हस्के, उपमहापौर रमाकांत मढवी, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा
अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे आणि गोकूळ कदम यांनी यावेळी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला. शिवसेना उमेदवार संजय मोरे यांचा विजय निश्चित असल्याने आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी बंजारा समाजानेही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला.