उद्धव ठाकरे यांनी घेतली उष्माघाताने आजारी पडलेल्या श्री सदस्यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात दुर्दैवी घटना घडली. या सोहळ्यासाठी आलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा तडाखा बसला. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर 150 जणांवर कामोठे, पनवेल, नवी मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कामोठे येथील रुग्णालयाला भेट देऊन महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे आजारी पडलेल्या रुग्णांची विचारपूस केली.

तसंच, त्यांनी या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या श्री सदस्यांना ट्वीटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.’नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात काही श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत दुर्दैवी आहे. मृत श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना!’ असं ट्वीट करून उद्धव ठाकरे यांनी खारघर येथे सोहळ्यावेळी मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांना आदरांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आज खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर दासबोधाचे ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळय़ास राज्यभरातून लाखो श्री सदस्य उपस्थित होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र उन्हाचा पारा 40 डिग्रीच्या वर गेल्याने श्री सदस्यांना उष्माघाताचा तडाखा बसला.