
पावसाळ्याला सुरुवात झाली असतानादेखील शहरातील नालेसफाई पूर्ण झालेली नाही. त्यातच ठाणे महापालिकेचा एक भाग असलेल्या दिव्यात तर नाले अद्याप तुंबलेले असल्याने यंदा पावसाळ्यात दिवा बुडणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिवा शहरातील प्रत्येक नाला कचऱ्याने भरलेला असल्याने दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी शहरातील नाल्यांची आज पाहणी करत नाले तत्काळ साफ करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच नाल्यातून काढलेला गाळ दुसऱ्या दिवशी उचलण्यात यावा, एका आठवड्यात नालेसफाई पूर्ण झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शहरप्रमुख सचिन पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. यावेळी विधानसभा संघटक योगिता नाईक, महिला शहर समन्वय प्रियांका सावंत, विभागप्रमुख शनिदास पाटील, नागेश पवार, उपविभागप्रमुख संजय अर्दाळकर, शाखाप्रमुख प्रतीक म्हात्रे, सचिन पारकर, ओकेश भगत, मूर्ती मुंडे, सुयोग राणे, विकास उमेकर, अमोल म्हात्रे, तेजस फोपाळे उपस्थित होते.