मालमत्ता हस्तांतरण फी 50 टक्के कमी करा; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेची पालिकेकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मुंबईकरांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांचे हस्तांतरण करताना आकारण्यात येणारी हस्तांतरण फी 50 टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी शिवसेनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील कामगार, कर्मचारी यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. काही जणांसमोर दैनंदिन खर्चाचा तसेच उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबईत आणि महाराष्ट्रात घर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात 5 टक्क्यांवरून 2 टक्के कपात केली आहे. त्याचा फायदा नव्याने घर खरेदी करणाऱ्यांना झाला. परंतु, मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्तांचे हस्तांतरण करणाऱ्यांना असा फायदा होत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात (प्रॉपर्टी ट्रान्सफर फी) कोणत्याही प्रकारची सूट दिली नसल्यामुळे मुंबईकर मेटाकुटीला आले आहेत.

आज साधारण 300 चौरस फुटाच्या मालमत्तेची ट्रान्सफर फी सुमारे 1 लाख 20 इतकी असून मुंबईकरांना ही फी परवडत नाही. त्यामुळे महापालिकेने ही हस्तांतरण फी 50 टक्क्यांनी कमी करून मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.