शिवसेनेची पुन्हा जोमाने बांधणी करूया! घाटकोपरमध्ये शिवसैनिकांचा दणदणीत मेळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमदारांच्या बंडखोरीने डगमगून जाण्याची गरज नाही. शिवसेनेने अशा अनेक हल्ल्यांचा यशस्वी सामना केला आहे. त्यामुळे आताही डगमगून न जाता शून्यापासून सुरुवात करून शिवसेनेची पुन्हा जोमाने बंधणी करूया. एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन शिवसेना नेते व राज्याचे माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

ईशान्य मुंबई विभाग क्र. 8 च्या वतीने विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी विभागातील शिवसैनिकांचा भव्य मेळावा घाटकोरपमध्ये आयोजित केला होता. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते बोलत होते. आज बंडखोरी करत आमदार पळून गेले असले तरी शिवसैनिकांनी बिलकूल डगमगू नये. एकजुटीने आपण काम करून पुन्हा आमदार, नगरसेवक निवडून आणूया, असेही रावते यांनी स्पष्ट केले. पळून गेलेल्या आमदारांनी आधी आपण कोण होतो याचा विचार करावा. आज ते केवळ शिवसेनेमुळेच आमदार होऊ शकले हे वास्तव आहे.

त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी शिवसैनिकांनी चिंता करू नये, असेही रावते म्हणाले. यावेळी शिवसेना प्रवक्त्या-आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनीही शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. दरम्यान, गद्दारांना धडा शिकवायचाच असा निर्धारही शिवसैनिकांनी यावेळी केला. या मेळाव्याला विभाग संघटक डॉ.भारती बावदाने, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांच्यासह उपविभागप्रमुख, नगरसेवक, नगरसेविका, शाखाप्रमुख मोठय़ा संख्येने उपस्थित होते.