
करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरातील प्राचीन मनकर्णिका कुंडावरील अतिक्रमणाचा प्रश्न आज शिवसेनेच्या दणक्याने अखेर मार्गी लागला. शिवसेनेच्या इशाऱ्याने उपरती आलेल्या संबंधित लॉज मालकाने अखेर हे कुडावरील अतिक्रमणाची जागा देवस्थान व्यवस्थापन समितीकडे देण्याचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडे दिले.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिर परिसरातील 60-65 वर्षांपूर्वी महानगरपालिकेला सार्व.बागेसाठी दिलेला प्राचीन मनकर्णिका कुंड कालांतराने बुजविण्यात आला होता. यावर शौचालय बांधण्यात आल्याने, भाविकांकडूनही तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
शिवसैनिकांनी हे वादग्रस्त शौचालय हटवून, प्राचीन कुंड पुर्ववत खुला करण्याची मागणी लावून धरली होती. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासुन हा कुंड पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली खुला करण्यात येत असून,खोदकामात अडथळा येणाऱ्या हार-फुले विक्रेत्यांनी सहकार्य केले. पण सरकारी मोजणीत कुंडाच्या जागेत अतिक्रमण झाल्याचे समोर आलेल्या संबंधित लॉज मालकाला अतिक्रमण हटविण्यासाठी देवस्थान व्यवस्थापन समितीने विनंती करूनही त्याने न्यायालयाकडून स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला.
महानगरपालिकेकडेही या लॉजचा बांधकाम तसेच व्यवसायाचा पुरावा नसल्याने, हे लॉज अतिक्रमणच असुन, जनताच उद्ध्वस्त करेल असा इशारा प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. तरीसुद्धा लॉज मालकाने दाद दिली नाही.
दरम्यान गेल्या आठवड्यात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी संबंधित लॉजसमोर निदर्शने करुन,मालकाला धारेवर धरत, सोमवारपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. यावेळी या कुंडाच्या जागेत अतिक्रमण झाल्याचे संबंधित लॉज मालकाने कबुलही केले होते. तर याच जागेवरील वादग्रस्त शौचालय शिवसैनिकांनीच उद्ध्वस्त केल्याची आठवण करून देत, तातडीने मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण त्वरित काढा, अन्यथा शिवसैनिक शिवसेना स्टाईलने ते काढतील असा इशारा शिवसैनिकांनी दिला होता.
त्यामुळे अखेर संबंधित लॉज मालकाने कुंडावर अतिक्रमण होणारी जागा देवस्थान व्यवस्थापन समितीकडे देत असुन, शिवसेनेचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती मालकाने पत्राद्वारे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्याकडे केली आहे.

























































