
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पुलवामामधील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 42 जवान शहीद झाले आहेत. या दहशतवादी हल्लाचा निषेध करत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘जोश’ आत्ता दाखवा आणि अमेरिकेने लादेनला पाकिस्तानात घुसून मारले तसे या मसूद अझहरला देखील ठार मारा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांना या हल्ल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले. या प्रश्नावर उत्तर देत असताना ते म्हणाले की “आपण उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक केला. सध्या उरी नावाचा चित्रपट सुरू आहे. त्याचा देखील राजकीय दृष्टीने प्रचार केला जात आहे. हाऊ इज द जोश!, जोश आत्ता दाखवा. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर अमेरिकेने त्यांच्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. हा जो कोणी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या पाकिस्तानमध्ये आहे अजहर मसूद तुम्ही त्याचा बदला कसा घेणार आहात ?” विरोधात असताना आम्ही अशा हल्ल्यांसाठी युपीए सरकारला दोष देत होतो, सरकार बदलल्यानंतर एकाच्या बदल्यात 10 पाकिस्तानी सैनिकांचे बळी घेऊ असं सांगितलं गेलं मात्र दुर्दैवाने आज फक्त आमचे बळी जात आहेत अशी खंत राऊत यांनी बोलून दाखवली.



























































