शिवसेनेचा उद्यापासून ‘माऊली संवाद’, आदेश बांदेकर साधणार कष्टकरी महिलांशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘जनआशीर्वाद यात्रा’ला राज्यभरातील जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे ग्रामीण जनतेशी संवाद साधत असून ‘आदित्य संवाद’द्वारे विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेत आहेत. आता उद्यापासून शिवसेना ‘माऊली संवाद’ मोहिमेद्वारे गावागावांतील कष्टकरी महिलांपर्यंत पोहचणार आहे.

महाराष्ट्राचे लाडके ‘भावोजी’, शिवसेना सचिव आदेश बांदेकर हे या माऊली संवाद मोहिमेत राज्यातील गावागावांमध्ये जाऊन कष्टकरी महिला भगिनींसोबत गप्पा मारणार आहेत. त्यांची सुखदुःखे जाणून घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात बांदेकर हे 2 ऑगस्ट रोजी पालघर येथे तर 3 ऑगस्ट रोजी भिवंडी येथे जाऊन माऊलींसोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर 4 ऑगस्टला ते बीड येथे आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत सहभागी होणार आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.