माहुल गावातील नागरिकांना नुकसानभरपाई द्या! शिवसेनेची ‘बीपीसीएल’वर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘बीपीसीएल’मध्ये झालेल्या स्फोटामुळे माहुल गाव परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरले. त्याचप्रमाणे येथील  नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले. या रहिवाशांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कंपनीने तत्काळ द्यावी. त्याचप्रमाणे रिफायनरीमुळे होत असलेल्या प्रदूषणावर नियंत्रण आणावे या मागणीसाठी शिवसेनेने आज चेंबूर येथील ‘बीपीसीएल’ कंपनीवर धडक दिली.

शिवसेनेच्या वतीने ‘बीपीसीएल’ कंपनीवर आज मोर्चा काढण्यात आला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यासह शिष्टमंडळाने ‘बीपीसीएल’च्या अधिकार्‍यांची भेट घेतली. या परिसरातील माहुल गाव, गव्हाणपाडा, वाशी गाव, अंबापाडा, जिजामाता नगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटाच्या हादर्‍याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या राहिवाशांना नुकसानभरपाई मिळावी, रिफायनरीकडून होणारे प्रदूषण कमी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नुकसानभरपाई देणार; कंपनीचे आश्वासन

शिवसेनेने काढलेल्या धडक मोर्चानंतर कंपनी प्रशासन वरमले. स्फोटातील जखमींना नुकसानभरपाई देण्यात येईल. त्याचप्रमाणे परिसरातील ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.