MIM ही भाजपची बटिक; कपटनितीचा कळस गाठला, विनायक राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात सत्ता मिळविता येत नसल्यामुळे भाजपने कपटनितीचा कळस गाठला आहे. MIMची पिलावळ महाविकास आघाडीवर सोडली आहे. परंतु, त्यांना कधीही स्थान मिळणार नाही. एमआयएमने भाजपचे बटिक म्हणून जरूर राहावे. उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत एमआयएमचा बटिक म्हणून वापर केला. गाडीवर गोळीबार केल्याची ड्रामेबाजी उघड झाली आहे. एमआयएमसारखी विषारी पिलावळ औरंगजेबाच्या थडग्याशी जोडली गेली, ती स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपची बटिक झाली आहे. खासदार जलील यांचा बोलवता धनी हा भाजप असल्याचे उघड झाले आहे, असे खासदार विनायक राऊत म्हणाले.

आता ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही; विनायक राऊत यांचा इशारा

हिंदुत्वाच्या विचाराने भारावलेल्या हिंदुस्थानातील जनता-जनार्दनानीं शिवसेनाप्रमुखांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी बहाल केली आहे. आदरणीय अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचे अनुकरण केले. मात्र, जनाब देवेंद्र मियाँ यांनी शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा केला. त्यांचे हे वक्तव्य अत्यंत निंदनीय असून त्यांच्या या वक्तव्याचा तीव्र धिक्कार करतो, असे ते म्हणाले. भाजपने कपटनितीचा कळस गाठला असून शिवसेनेच्या वाट्याला जाल तर याद राखा, ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला.

राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून 22 ते 25 मार्च दरम्यान मराठवाडा, विदर्भात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. शिवसंपर्क अभियानाला सुरूवात करण्यापूर्वी शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी मंगळवारी शिवसेना संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिवसंपर्क अभियानाची भुमिका त्यांनी स्पष्ट केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब असे संबोधले. त्यांच्या या निंदनीय वक्तव्याचा धिक्कार करतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी केंद्र किंवा राज्य सरकारने दिलेली नाही. हिंदुत्वाच्या विचाराने भारावलेल्या हिंदुस्थानातील जनता-जनार्दनांनी शिवसेनाप्रमुखांना हिंदुहृदयसम्राट ही पदवी बहाल केली आहे. आदरणीय अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचे अनुकरण केले. भाजपमधील मोठ्या मंडळी शिवसेनाप्रमुखांचा आजही आदराने उल्लेख करतात. शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असा व्यापक विचार मांडला. हा विचार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील स्विकारला असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले

तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या कार्यकाळात गोद्रा हत्याकांड घडल्याच्या कारणावरून भाजपचे वरिष्ठ नेतेमंडळी त्यांच्या विरोधात गेली होती. परंतु हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. शिवसेनाप्रमुखांनी नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली.

दोन वर्षापूर्वीच जनाब देवेंद्र मियाँ झाले

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणे हे पाप फडणवीस यांनी केले. जनाब उच्चारुन केलेले हे पाप क्षम्य नाही. हिंदूवासियांनी धिक्कार केला. दोन वर्षापूर्वीच देवेंद्र मियाँ जनाब झाले. या जनाबांनी हिंदुत्वाला गुंडाळून ठेवले. त्यांना जनाब ही पदवी बहाल केली. जनाब देवेंद्र मियाँ स्वत:चा उल्लेख जनाब म्हणून करून घेतला.

मताच्या लाचारीसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही

जनाब देवेंद्र मियाँ यांनी मुस्लीमांच्या मताच्या लाचारीसाठी दोन वर्षापूर्वी त्यांना जनाब ही पदवी बहाल केली. मात्र, मताच्या लाचारीसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. व्यापक निष्ठेचे हिंदुत्व सर्वोच्च न्यायालयात शिक्कामोर्तब केले. शिवसेनेला व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. तरी देखील महाविकास आघाडी सरकार तीन पक्षाचे असून त्यांची वज्रमुठ कायम आहे.

या पत्रकार परिषदेला शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजूरकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, कृष्णा डोणगावकर, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप आदींची उपस्थिती होती.