
रिफायनरी प्रकल्प हा नाणारमधून हद्दपार झाला आहे. हा विषय संपलेला आहे. हा विनाशकारी प्रकल्प रद्द करण्याची मागणी स्थानिक जनतेने केली. त्यानुसार स्थानिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा येण्याची सूतरामही शक्यता नाही. हा प्रकल्प पुन्हा आणण्याची स्वप्ने कुणीही पाहू नयेत, अशा शब्दांत शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्पाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
नाणार प्रकल्पाविषयीची भूमिका मांडताना स्थानिक आमदार राजन साळवी यांनी ‘शिवसेना स्थानिक नागरिकांच्या कायम सोबत आहे. त्यामुळेच हा प्रकल्प रद्द करण्यात आला. पण सध्या कोकणात उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल’ असे वक्तव्य प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले होते. यावर पुढे बोलताना राजन साळवी यांनी हे वक्तव्य शिवसेना पक्षाची भूमिका नसून आपली वैयक्तिक भूमिका असल्याचे सांगितले. खासदार विनायक राऊत यांनी यावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना स्थानिक जनतेचा या प्रकल्पाला 100 टक्के विरोध आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प पुन्हा होणार नाही असे स्पष्ट केले.
राजन साळवी यांची भूमिका वैयक्तिक
नाणार रिफायनरीबाबत आमदार राजन साळवी यांनी मांडलेले मत हे वैयक्तिक मत आहे. त्याच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सरकार यांचा काहीही संबंध नाही, असे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही जैतापूर प्रकल्प आणि नाणार प्रकल्पाबाबत आमदार राजन साळवी यांनी केलेले वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे ट्विट केले.
शिवसेना स्थानिकांसोबत – एकनाथ शिंदे
नाणार प्रकल्प रद्द झाला आहे. नाणारला लोकांचा विरोध होता. शिवसेना स्थानिक लोकांसोबत आहे. जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हादेखील त्यांनी त्या भागाचा दौरा केला होता. शिवसेना लोकांच्या आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढत असते, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
काही लोकांचा विरोध -देवेंद्र फडणवीस
नाणारमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागा देण्याची लोकांची तयारी आहे. केवळ काही लोकांचा विरोध आहे म्हणून शिवसेना विरोध करत आहे. या प्रकल्पात जवळपास अडीच लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. राज्याच्या तिजोरीत यामुळे कोट्यवधी रुपये आले असते. जैतापूरप्रमाणे नाणारबाबत लोक तयार होतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.




























































