
पुनर्वसन प्रक्रियेचा घोळ शासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतरही न्याय न दिल्यामुळे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात शहरात जनआक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सिनाळा, नवेगाव व मसाळा जुना येथील जनतेच्या समस्या काय आहे, पुनर्वसन प्रक्रियेत घोळ झालेला असून शासनाच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर आणि वारंवार पाठपुरावा करून सुद्धा न्याय देण्यात आला नाही. तसेच गावामध्ये ग्रामसभा आणि पुनर्वसन समितीची सभा न लावता गावकऱ्यांना विश्वासात न घेता ठराव देण्यात आले. ते गावकऱ्यांना मान्य नाही. पुनर्वसन ठिकाणी वाटप करण्यात येणारे प्लॉट तिन्ही गावांना समप्रमाणात विभागणी करून ईश्वर चिठ्ठी द्वारे वाटप करण्यात यावे. घराचा मोबदला मिळाल्यानंतर घर बांधकामासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात यावा व बांधकामासाठी 80 टक्के रक्कम देण्यात यावी. घराचा ताबा घेतेवेळी 20 टक्के रक्कम देण्यात यावी. प्रत्येक कुटुंबाला वनविभागप्रमाणे 10 लाख रुपये मोबदला देण्यात यावा. वेकोलीमध्ये गावातील बेरोजगारांना काम देण्यात यावे, या मागण्यांसाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधलं.
या मोर्चात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, महानगर प्रमुख प्रमोद पाटील, कुसुमताई उदार, भारती दुधानी, सुरज घोंगे यांच्यासह शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता.
































































