शिवसेनाप्रमुखांच्या कार्याला साजेसे काम करण्यासाठीच रोजगार मेळावे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला साजेसे काम करण्यासाठीच रोजगार मेळाव्यांचे आयोजन राज्यात करण्यात येत आहे. या मेळाव्यांत मुलाखतीस येणाऱया प्रत्येकाला नोकरी मिळावी अशी शासनाची भूमिका आहे. मेळाव्यात नोंदणी झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांना मुलाखत घेण्याबरोबरच त्यांना नोकरी मिळेपर्यंत उद्योग विभागामार्फत पाठपुरावा केला जाईल. कोणीही निराश होणार नाही यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले.

यावेळी तरुणांनी संधीला सामोरे जाऊन संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करावे असा सल्ला देताना, यापुढील काळात रोजगार मेळाव्याबरोबरच स्वयंरोजगार मेळावेही घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योग विभागाच्या वतीने येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचा शुभारंभ सुभाष देसाई,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उद्योग सहसंचालक व्ही. एल. राजाळे आदी उपस्थित होते.

मेळाव्यास सीआयआय कंपनीचे योगेश कुलकर्णी, नितीन वाडेकर, रोजगार उद्योजकता व कौशल्य विभागाचे सहाय्यक संचालक जे. बी. करीम, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने, उद्योग विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध कंपन्यांचे प्रमुख आणि हजारो तरुण-तरुणी उपस्थित होते.