उद्धव ठाकरे आज अयोध्येच्या पवित्र भूमीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेश तुळशी । लखनौ

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आज शनिवारी प्रभू रामचंद्रांच्या पवित्र अयोध्यानगरीत आगमन होत आहे. रामाचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांना राममंदिराची आठवण करून देण्यासाठी अयोध्येत दाखल होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाविषयी संपूर्ण उत्तर प्रदेशात जबरदस्त उत्सुकता निर्माण झाली असून ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी रामजन्मभूमी दुमदुमून गेली आहे. राजधानी लखनौपासून ते अयोध्येपर्यंत सर्वत्र उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे फलक झळकत आहेत. अयोध्येत तर भगवे तुफानच उसळले असून तब्बल 26 वर्षांनी अवघा उत्तर प्रदेश पुन्हा एकदा रामरंगात न्हाऊन निघाला आहे. बाबरी मशिदीच्या पतनाची जबाबदारी अभिमानाने स्वीकारणाऱया शिवसेनेने राममंदिर निर्माणासाठी नव्याने हाती घेतलेल्या मोहिमेला अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेशात प्रचंड पाठिंबा मिळत असून आपल्या दोन दिवसांच्या दौऱयात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले शिवनेरीच्या पवित्र मातीचा मंगल कलश हाती घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या शनिवारी दोन दिवसांच्या अयोध्या दौऱयावर येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या भेटीबद्दल उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱयात कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. ‘हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार’ ही उद्धव ठाकरे यांनी दिलेली घोषणा अयोध्यावासीयांनी डोक्यावर घेतली आहे. 6 डिसेंबर 1992 ला बाबरीचा ढाचा पाडल्यापासून रामलल्लाचे मंदिर तात्पुरत्या निवाऱयात बंदिस्त आहे.जन्मभूमीतच चोवीस तास सुरक्षारक्षकांच्या नजरकैदेत असलेल्या प्रभू रामचंद्रांची बंदिस्त राहुटीतून सुटका करण्याच्या आश्वासनाचे काय झाले? असा सवाल करून उद्धव ठाकरे रामजन्मभूमीच्या दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्याचे वारंवार वचन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला याच वचनाची आठवण करून देण्यासाठी उद्धव ठाकरे येत असल्यामुळे अयोध्येसह देशभरातील रामभक्त आनंदले आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या भूमिकेचे संत महंतांनी व अयोध्यावासियांनी स्वागत केले असून उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.अयोध्यानगरीत ठिकठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे फलक झळकत आहेत. ‘पहिले मंदिर, फिर सरकार’ या घोषणेने अयोध्यावासीयांची मने जिंकली असून दोन दिवसांच्या अयोध्येतील वास्तव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात, कोणता विचार मांडतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

sharayu-river-1

– उद्धव ठाकरे आज खासगी विमानाने अयोध्येत येतील. तेथे विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत होईल

– अयोध्येतील लक्ष्मण किला… याच ठिकाणी शनिवारी संतमहंतांच्या उपस्थितीत आशीर्वचन सोहळा होणार आहे या सोहळय़ाची जय्यत तयारी झाली असून याच ठिकाणी अयोध्येतील संतमहंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देणार आहेत.

– अवघ्या देशाचे आणि तमाम हिंदूंचे लक्ष लागून राहिलेल्या शरयू तटावर ते सायंकाळी 5 वाजता आरती करतील