
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाई-रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्या दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता देवरूख आणि संध्याकाळी सहा वाजता कुडाळ येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहिर सभा होणार आहेत. दोन्ही सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून कोकणातील वातावरण भगवामय झाले आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणाने सातत्याने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आणि शिवसेनेने कोकणाला भरभरून दिले आहे. त्यामुळे उद्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजता देवरूख येथील सावरकर चौक येथे महायुतीच्या जाहिर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई,शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर,महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत,भाजप नेते राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर उपनेते आमदार उदय सामंत,लक्ष्मण वडले,संपर्कप्रमुख सुधीर मोरे,शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके,भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने,आमदार सदानंद चव्हाण,राजन साळवी उपस्थित रहाणार आहेत.त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कुडाळ येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रचार सभा होणार आहे.
पूर्वीचा राजापूर आणि सध्याचा रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व राहिले आहे. सुरेश प्रभू या मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आले होते तर 2009 साली कॉंग्रेसकडे गेलेला मतदारसंघ विनायक राऊत यांच्या रुपाने महायुतीने 2014 च्या निवडणूकीत खेचून आणला


























































