
सामना ऑनलाईन, मुंबई
‘तुमच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना को पटकनेवाला पैदा हुआ नही और पैदा होनेवाला नही है.’ असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांचा सणसणीत समाचार घेतला. स्थानिय लोकाधिकार महासंघाच्या अधिवेशनाला संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांच्या खणखणीत भाषणाने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. ‘राज्यात युती झाली तर ठीक नाही तर विरोधीयोंको पटक देंगे’ असं विधान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूरमधील सभेत केले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच या विधानाचा समाचार करीत केली. उद्धव ठाकरे म्हणाले की ” वल्लभभाई स्टेडीयममध्ये पूर्वी कुस्त्या व्हायच्या. एक दुसरे को पटक देते है लोग. म्हटलं चला आपणही उतरून बघूया. कारण पटकनेवाला आजतक कोई पैदा नही हुआ है. मी येताना ते वाक्य वाचलं की आही अनेक भरत्या ओहोट्या पाहिलेल्या आहेत. लाट कसली लाट, लाटेची आम्ही लावू वाट. आमची वाट ही भगवी वाट आहे, तुमच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना को पटकनेवाला पैदा हुआ नही है, पैदा होनेवाला नही है.”
काहींना काम न करता टीमकी वाजवायची सवय
उद्धव ठाकरे यांनी स्थानिय लोकाधिकार महासंघाचे या अधिवेशनात बोलताना कौतुक केले. ते म्हणाले की “स्थानिय लोकाधिकार समिती हा शिवसेनेचा पाठकणा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मराठी माणसाला मान खाली घालून जगायला भाग पाडलं होतं. त्या मराठी माणसाला मराठी मनगटातील ताकद काय असते याची जाणीव शिवसेनाप्रमुखांनी करून दिली. असा समर्थ वारसा असलेल्या आपल्याला कोणी लेचेपेचे समजू नये.” पुढे बोलताना ते म्हणाले की “लोकाधिकार समितीला कोणतंही काम सांगितल्यानंतर ते यशस्वीरित्या पूर्ण केल्याशिवाय हा मावळा परतत नाही. लोकाधिकार समिती काय काम करते हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे पण जे जनतेला कळावं यासाठी मी इथे आलेलो आहे.” अनेकदा स्वत:ची टीमकी स्वत:लाच वाजवायला लागते. ‘काहीजण काम न करता नुसतीच टीमकी वाजवत असतात’ असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशासोबत टाळ्यांचा कडकडाट झाला.
पोकळपणा दाखवणे म्हणजे टीका नाही
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये शिवसेनेचे दणका कसा असतो याचे उदाहरण सांगितले. ते म्हणाले की “गेल्या आठवड्यात माझ्या सभेत शिवसैनिक एका शेतकऱ्याला घेऊन आला. त्या शिवसैनिकाने सांगितले की या शेतकऱ्याकडे कर्जमाफीचे प्रमाणपत्र आहे पण त्याची कर्जमाफीच झालेली नाही. हे उघड केल्यानंतर ४-५ तासांमध्ये असा काही दणका बसला की मुंबईतून हालचाल झाली आणि त्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले आणि त्याचे कर्ज माफ झाले.” राज्यसरकारने घोषित केलेल्या कर्ममाफी योजनेतील घोटाळाच उद्धव ठाकरे यांनी बीडमधल्या सभेत उघडकीस आणला होता. हे उदाहरण देत असतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की पोकळपणा दाखवणे म्हणजे टीका होत नाही.
माझ्या देशाचं काय होणार हा प्रश्न कोणालाच पडलेला नाहीये.
देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की ‘आता जे वर्ष सुरू झालं आहे ते २०१९ नाही तर पुढची सगळी वर्ष आपली असणार आहेत’ देशात सध्या चर्चा या फक्त कोणी कोणाशी युती केली तर काय होईल, कोणाची टक्केवारी कशी वाढेल,मतं कशी वाढतील याच्या सुरू आहे. मात्र देशाची कोणालाच चिंता पडलेली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. मला या गोष्टींची चिंता नसून मला चिंता माझ्या देशाची आहे,देश कसा सुधारेल, त्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल याची आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
असले मजबूत सरकार चुलीत घालायचे नाही तर मग काय करायचे ?
भाजपचे शविवारी राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनामध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी मजबूर सरकारहवंय का मजबूत सरकार हवंय असा प्रश्न विचारला होता. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ‘ एकवेळ सरकार मजबूर असले तरी चालेल मात्र माझा देश मजबूत असला पाहिजे’ मजबूत सरकार असताना काय झालं आणि मिलंजुलं म्हणजेच मजबूर सरकार असताना काय, देश मागे गेला का पुढे गेला याचा एकदा आढावा घ्या आणि लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांची सणसणीत टोलेबाजी सुरू ठेवत म्हटले की ” मजबूत सरकार डोक्यात हवा गेल्यानंतर देशातील नाही तर देशाच्या विरोधकांचा गळा चेपणारा पंतप्रधान नसेल आणि तो आमच्याच छाताडावर बसणारा असेल तर मग असलं मजबूत सरकार हे सगळ्यांनी मिळून चुलीत घायालचे नाही तर कुठे घालायचे ?”
अटलजींचे सरकारही मिलेजुले सरकार होते म्हणजेच जर ते मजबूर सरकार होते तर मग ते वाई’ सरकार होते का ? असा विचार करायला लावणारा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. ‘ ममता, समजा आणि जयललिता यांनी परेशान करून टाकले होते तरीही अटलजींनी कारगिलचं युद्ध जिंकले होते आणि अणुचाचणीही यशस्वी करून दाखवलीच नाही’ याची आठवणही उद्धव ठाकरे यांनी करून दिला
वैशाली येडेंनी शहाणपणा शिकवला
यवतमाळमधल्या साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांच्याऐवजी शेतकरी विधवा पत्वी वैशाली येडे यांना उद्घाटनाचा मान देण्यात आला. या संमेलनातील त्यांचे भाषण उद्धव ठाकरे यांनी ऐकले. याबाबत बोलताना ते म्हणाले की “या महिलेचे आडवान येडे असले तरी तिने शहाणपणा शिकवला. या भगिनीने सांगितले की पर्याय उरला नाही म्हणून त्यांच्या पतीने आत्महत्या केली. पण या महिलेने म्हटले की आत्महत्या पर्याय नाही मला लढलंच पाहीजे.”
तळपायाची आग मस्तकात गेली तर ती आग तुमते सिंहासन जाळून खाक करेल
लोकांमध्ये भ्रम निर्माण केल्यानंतर तो जर लोकांना भ्रम आहे हे कळालं तर काय होईल याची कल्पना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिली आहे. ” पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या भागातील महिलांना डांबरी रस्त्यावर आणून मृगजळाकडे बोट दाखवून ते बघा पाणी असं सांगितलं जातं, बस थोडं सहन कर. त्या महिलेचे पाय भाजत असतात, पण पाणी मिळेल या आशेने ती चालत रहाते. 2014 ला सांगायचं की 2019 ला पाणी देतो, मग सांगायचं की 2028 ला पाणी देतो असं म्हणच चालूच ठेवायचं. या मृगजळापायी लोकांचं आयुष्य करपून जातं. जर या डांबरी रस्त्यावरून चालणाऱ्यांना कळालं की हा भ्रम आहे,मृगजळ आहे आणि त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली तर मस्तकातील आग तुमचे सिंहासन जाळून खाक करेल.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
विश्वास कमावलात तर पानिपतच काय कोणतीही लढाई जिंकाल
आगामी लोकसभा निवडणुका या पानिपताच्या तिसऱ्या लढाईसारख्या आहेत, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले होते. हाच धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले की ‘ विश्वास गमावला तर कोणतंही युद्ध हरतो. मात्र विश्वास कमावला तर युद्ध पानिपतचे असो किंवा कोणतेही युद्ध जिंकता येते.’
हनुमानाची जात शोधणाऱ्यांचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला. ‘ आपण इतके थंड रक्ताचे झाले आहोत का की आपल्या देवादिकांची जात विचारली जाते’ असा सवाल त्यांनी विचारला. कोणी म्हणतो की हनुमान हा दलित होता, कोणी म्हणतो हनुमान हा मुसलमान होता. दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या देवाची जात गेली तर जात काढणाऱ्याचे दात पाडले जातील आणि नंतर त्याला सांगितलं गेलं असतं की गाढवा आज फक्त दात पाडलेत उद्या डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही.
राम मंदिराच्या मुद्दाला हात घालत उद्धव ठाकरे ठासून पुन्हा म्हणाले की होय! मी तो मुद्दा निवडणुकीसाठीच घेतला. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून ताकाला जाऊन भांडं लपवणारी माझी अवलाद नाहीये. जे आहे ते मी ठणठणीतपणाने सांगतो. मोदींना त्यांच्या कार्यकर्त्यांनी विष्णूचे 13 म्हटलंय. मग हे विष्णूते अवतार अवतार, जगातील सर्वशक्तीमान पुरुष नरेंद्र मोदी हे रामाचं मंदिर बांधू शकत नाही का ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
काँग्रेस राम मंदिराच्या आड कशी येते ते सांगा
राम मंदिर निर्माणाच्या आड काँग्रेस येते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विधान केलं होतं. काँग्रेस राम मंदिराच्या आड येते होती म्हणूनच जनतेने त्यांना घरी पाठवून दिलं होतं. काँग्रेसचा विरोध पक्षनेता देखील झालेला नाहीये एवढी जबरदस्त शिक्षा तमाम जनेतेने काँग्रेसला दिली होती. आज तुमच्याकडे संपूर्ण बहुमत असताना देखील त्यात काँग्रेस अडथळा आणत असेल म्हणून सांगत असाल तर काँग्रेसने काय शेण खाल्लंय ती कशी आड येते हे जनतेला एकदा सांगा असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “सत्तेसाठी सोबत घेतलेल्या सग्यासोयऱ्यांना राम मंदिर हवं आहे का हा प्रश्न विचारा असं उद्धव ठाकरे यांनी भाजपला उद्देशून म्हटलं आहे. नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांनी राम मंदिराला विरोध केला होता. काँग्रेस राम मंदिराच्या आड येते म्हणून ती वाईट आहे तर राम मंदिराला विरोध करणारे साथीसोबती घेऊन तुम्ही राम मंदिर कसे बांधणार “असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
आरक्षणाच्या मुद्दावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की “मराठा आरक्षणाचा मुद्दा कोर्टामध्ये लटकून राहिलेला आहे. निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागलाच पाहिजे. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे पण मग धनगर समाजाचे काय ? “असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.सवर्णांना आरक्षणाच्या मुद्दावरही उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की “सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण दिल्यानंतर हा जुमला नाही हे कोणत्या सरकारी आस्थापनांमध्ये किती नोकऱ्या आहेत हे देखील जाहीर करा”
तर 8 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना इन्कम टॅक्सही माफ करा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की “ज्याचं उत्पन्न वार्षिक 8 लाख त्याला तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेले म्हणत आहात. एकीकडे तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांची व्याख्या वर्षाला 8 लाख उत्पन्न असलेल्या व्यक्ती अशी करताय आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं उत्पन्न अडीच लाख आहे त्याला तुम्ही इन्कम टॅक्स लावताय ? माझं म्हणणं असं आहे की देशाचं आणि सर्वसामान्यांचे भले करायचे असेल तर ज्याचे उत्पन्न 8 लाख आहे त्याचा इन्कम टॅक्स माफ करा. असं केल्यास मोदींजी तुमची छाती 56 नाही 256 इंचाची आहे असं मानायला आम्ही तयार आहोत. हे तुम्ही करू शकता, नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल आणि विश्वास गमावला की पानिपत कसे झाले हे इतिहासात आहेच.”
































































