इच्छा व्यक्त करणे म्हणजे नाराजी नव्हे, उद्धव ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

लोकसभा उपाध्यक्षपद मिळणे हा आमचा हक्कच आहे. पण एखादी इच्छा व्यक्त करणे, हक्काने मागणे म्हणजे नाराजी नव्हे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. आमचे सगळे व्यवस्थित चालले आहे. आमची युती काही झाले तरी आम्ही तुटू देणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

uddhav-thackeray-kolhapur-1

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या 18 खासदारांसह श्री देवी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सद्य राजकीय स्थितीवर पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.

केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. पक्षाने आणखी मंत्रीपदाची मागणी केल्याचे वृत्त आहे, याबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे नाराजी नव्हे. मागायचे आहे ते हक्काने मागतो आहे. नाराजी व्यक्त करायची त्यावेळी आम्ही केली होतीच. आता आमचे सगळे व्यवस्थित चालले असून ही युती तुटावी असे अनेकांना वाटते, पण त्यांचे हे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अंबाबाईला काय साकडे घातले, या पत्रकारांच्या प्र्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात दुष्काळस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार दुष्काळ निवारणासाठी काम करतच आहे; पण पाऊस लवकर पडावा आणि हा दुष्काळ दूर व्हावा असे साकडे अंबाबाईला घातल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

सीमावासीयांनी घेतली भेट
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जोपर्यंत सीमा प्रश्न दाव्याचा सुप्रीम कोर्टात निकाल लागत नाही तोपर्यंत सीमा भाग केंद्रशासित करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी संसदेत पाठपुरावा करण्याची विनंती त्यांनी उद्धव ठाकरे यांना केली.
यावेळी भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह शिवसेना आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

‘सामना’चा अग्रलेख आणि 370 कलम
शिवसेना कधीच काही चोरून करत नाही. जे काही असेल ते खुलेआम, बेधडक. आम्ही भाजपशी युती केली ती दोन-चार पदांसाठी नव्हे, तर हिंदुत्वासाठी केली आहे. अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर ते जे काही कश्मीरमध्ये करू इच्छितात, मग ते 370 कलम काढण्याची बाब असो, की आणखी काही. आमची युती त्यासाठी आहे. आज ‘सामना’च्या अग्रलेखात तीच भावना व्यक्त केली आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दुष्काळी भागाचा दौरा करणार
महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती भयावह आहे. म्हणूनच येत्या रविवारी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. केवळ कोरडी सहानुभूती दाखविण्यासाठी नव्हे, तर चारा छावण्यांमधील जनावरांसोबत काही शेतकरीही आहेत. त्यांना पुढील काही दिवसांचे अन्नधान्य वाटप करणार आहोत. ही सगळी माझी, आपली माणसे आहेत. त्यांची आपुलकीने चौकशी करणे, त्यांना मदत करणे हे माझे कर्तव्यच आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. या दौऱयात आदित्य ठाकरेसुद्धा सहभागी होतील असेही ते म्हणाले.

आमचं ठरलं
कोणी कितीही प्रयत्न केले तरी आमची युती तुटणार नाही. युती मजबूत आहे आणि ती अशीच पुढे मजबूत राहणार, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. यावर युतीतील काही घटक पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे त्याचे काय, असा प्रश्न पत्रकारांशी विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, काही काळजी करू नका. आमचं जागावाटपासंदर्भात ठरलंय!

अयोध्येला जाणारच
अयोध्येत श्रीराम मंदिर व्हायलाच हवे आणि ते होणारच, असे ठामपणे सांगतानाच संसद अधिवेशनापूर्वीच शिवसेनेच्या 18 खासदारांसह आपण अयोध्येला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अर्थात तारीख आणि दौरा कार्यक्रम अजून निश्चित व्हायचा आहे, असेही ते म्हणाले.