शिवसेनेच्यावतीने कर्नाटक सरकारचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमावासीय मराठी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवून सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा असल्याचे मत व्यक्त केले होते. कर्नाटक सरकारच्या चिथावणीने तथाकथित कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड वेदिका संघटनेच्या काही नेत्यांनी मराठी सीमावासिय बांधवांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती, अशा विकृत प्रवृत्ती विरोधात शिवसेनेच्यावतीने कराड येथील दत्त चौकात निदर्शने करुन निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्ष रेंगाळत आहे. सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी नेहमीच शिवसेना राहिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीच सीमा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असून मराठी सीमाबांधवांच्या विरोधात कर्नाटक नवनिर्माण सेना व कन्नड वेदिका संघटनेचे कार्यकर्ते विकृतपणे वक्तव्य व कृती करीत असल्यामुळे शिवसेनेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. कर्नाटक सरकारचा निषेध करणारे निवेदन शिवसेनेच्यावतीने कराड शहर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार,उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, कराड दक्षिण तालुका प्रमुख नितीन काशिद, शशिकांत हापसे,कराड उत्तर तालुकाप्रमुख किरण भोसले, सुनील पाटील,कराड शहर प्रमुख शशिराज करपे, मलकापूर शहरप्रमुख मधूकर शेलार,मलकापूर उपशहर प्रमुख सूर्यकांत मानकर, उपतालुका संजय चव्हाण यांच्यासह शिवसेनेच्या सर्व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.