भाजप हा एक चोरबाजार असून या चोरांचे सरदार देवेंद्र फडणवीस आहेत, संजय राऊत यांचा घणाघात

भारतीय जनता पक्ष हा एक चोर बाजार आहे. मुंबईत एक प्रसिद्ध चोर बाजार आहे. अख्ख्या मुंबईतले चोर या चोर बाजारात एकत्र येतात आणि चोरलेला माल विकायला बसतात. भारतीय जनता पक्षाचा अशाच प्रकारे एक चोर बाजार झालेला आहे. शिवसेना चोरा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरा, यांचे बाप चोरा, त्यांचे भाऊ चोरा असा भाजप हा चोरांचा बाजार झाला आहे  आणि त्या चोरांचे सरदार देवेंद्र फडणवीस आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. जळगाव मातोदा मतदारसंघात गुरुवारी उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा होता. या दौऱ्याच्यावेळी भाषण करताना त्यांनी भाजप व मिंधे गटावर निशाणा साधला.

नांदुरा गावातील पक्षकार्यालयाच्या उद्घाटनावेळी घडलेला किस्सा सांगताना राऊत म्हणाले की, ‘तिथल्या एका तरुण शिवसैनिकाने मला जय महाराष्ट्र केला आणि म्हणाला साहेब टरबूज फोडा, मला क्षणभर समजलं नाही, टरबूज फोडा म्हणजे काय. त्याने बाजूला असणाऱ्या फळांच्या दुकानातून टरबुज आणला आणि फोडला आणि म्हणाला साहेब असं टरबुज उद्याच्या निवडणुकीत फुटलं पाहिजे आणि ते फोडण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.’

हुकूमशाहीच्या विरोधात बोलताना ते म्हणाले की, बुलढाण्यातील खासदार असो अथवा लायकी नसताना शिवसेनेच्या नावावर आमदारकी मिळवलेले गद्दार असो, यापुढे ते लोकसभेत आणि विधानसभेत जाता कामा नये. महाराष्ट्र आणि देश संकटात आहे, आणि राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय करत आहेत. या देशातला शेतकरी संकंटात आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा म्हणून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाला आहे. मोदी सरकारने दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्यासाठी शसस्त्र सेना उभी केली असून ते त्या शेतकऱ्यांचे मुडदे पाडत आहेत. या देशात आपण जय जवान जय किसानचा नारा देतो, हा देश शेतकऱ्यांनी घडवला म्हणून सांगतो आणि त्याच शेतकऱ्यांवर आपण गोळ्या झाडण्याचे पाप करतोय. या मोदीला परत निवडून देता कामा नये ही गँरंटी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आज या देशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी समोर जर कोणाचे आव्हान असेल तर एकमेव नेता म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. अख्ख्या जगात त्यांच्या नावाचा डंका वाजत आहे. या देशात हुकूमशाहीच्या विरुद्ध एक नेतृत्व उभे राहिले आहे. ही हुकूमशाही आपल्याला संपवायची आहे.

जनसंवाद यात्रेला मिळत असलेल्या पाठिंब्यावरून ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने उद्धव साहेबांच्या जनसंवाद यात्रेला आपला पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा पाहून मी खात्रीने सांगू शकतो, की या महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येतेय आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, आणि दिल्लीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या पाठींब्याशिवाय कोणतेही सरकार बनू शकत नाही. अशा प्रकारची ताकद शिवसेनेच्या मागे उभी राहिलेले दिसतेय. बुलढाण्याने सुद्धा आपली जबाबदारी उचलली पाहिजे. लोकसभा, विधानसभा असो प्रत्येक निवडणूकीत खऱ्या शिवसेनेचा भगवा आपण फडकवलाच पाहिजे. उद्धव ठाकरे आपले, महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत. या देशाच्या नेत्याकडे संपूर्ण जग विश्वासाने पाहतं आहे. या देशात आणि महाराष्ट्रात बदल आणि परिवर्तन करण्याची हिंमत कोणामध्ये असेल तर ती माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.