मुंबईत प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रणाच अपुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची चर्चा होत असतानाच मुंबईत प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रणाच अपुरी असल्याची बाब शुक्रवारी विधान परिषदेत शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी मांडली. या गंभीर मुद्दय़ावर सभागृहात सखोल चर्चा केली जावी अशी मागणी त्यांनी नियम 97 अन्वये सूचना मांडून केली.

सध्या मुंबईत हवा प्रदूषणाची पातळी मोजमाप करण्यासाठी एकच मोबाइल व्हॅन उपलब्ध आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावल्याने महानगरपालिकेने बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा दिलेला आहे. त्यासाठी विशेष पथकेही तैनात केली गेली आहेत.

महानगरपालिकेकडे प्रदूषणाची पातळी म्हणजेच हवा गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणेची कमतरता आहे. सद्यस्थितीत भायखळा, घाटकोपर, गोवंडी, कांदिवली, शिवडी या ठिकाणी प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रणा महापालिकेने बसवलेली आहे. परंतु प्रदूषणाच्या पातळीचे मोजमाप करणारी केवळ एकच मोबाइल व्हॅन उपलब्ध आहे. त्यामुळे महापालिकेच्या हेल्पलाइनवर प्रदूषणाबाबत एखादी मोठी तक्रार आल्यास दखल घेणे अवघड होत आहे. मुंबई शहराचा आकार लक्षात घेत आणखी तीन व्हॅनची नितांत आवश्यकता आहे, अशी सूचना सुनील शिंदे यांनी मांडली.