
शेतकरी कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंदोलन करणाऱ्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्यात येत आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचे नागपुरात आंदोलन सुरू आहे. चक्का जाम करण्यात आला असून त्यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. या सर्व घडामोडी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये सुरू आहेत, आता फडणवीस तोंडाला पट्टी बांधून का बसले आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी केला. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांना अर्बन नक्षलवादी म्हणजे शहरी नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत, निवडणुकीबाबत, मतदार यादीतील घोळाबाबत, राज्याच्या समस्यांबाबत, बेरोजगारी, वाढती महागाई यावर कोणी बोलले तर त्यांनी शहरी नक्षलवादी, मओवादी घोषित करण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू आंदोलन करत आहेत. मात्र, काही काळ वगळता बच्चू कडू हे त्यांच्यासोबतच होते. बच्चू कडू, फडणवीस आणि भाजप नेत्यांच्या गळ्यातगळे घालून फिरत होते. मात्र, आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवल्याने त्यांना शहरी नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. सातबारा कोरा करा, ही त्यांची महत्त्वाची मागणी आहे. सातबारा कोरा करा, किंवा चालते व्हा, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. ही मागणी त्यांनी सर्वात आधी केली होती. आता ती मागणी पुन्हा एकदा जोर धरत असेल तर आंदोलकांना शहरी नक्षलवादी ठरवणे कितपत योग्य आहे? आंदोलन केले की शहरी नक्षलवादी ठरवण्यात येते, तर मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी मंत्र्यांना अर्बन नक्षलवादी का ठरवण्यात येत नाही? मंत्रिमंडळात अनेक भ्रष्टाचारी अॅनाकोंडा बसले आहेत. त्यांना नक्षलवादी का ठरवत नाही? असा सवालही त्यांनी केला. बच्चू कडू यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे. ते अराजकीय आंदोलन आहे. हे दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शेतकऱ्यांनी आवाज उठवायचा नाही काय? असा सवालही त्यांनी केला.






























































