निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना निधी मिळत नसेल तर हा लोकशाहीचा घोर अपमान – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यावर वाढलेला कर्जाचा बोजा आणि आर्थिक बेशिस्त यावर परखड मत व्यक्त केले. निवडणुका जिंकण्यासाठी राज्यात निधीचे असमान वाटप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी निधी देण्यात येत नाही, हा लोकशाहीचा आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा घोर अपमान आहे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

राज्यावर 9 लाख कोटींचे कर्ज आहे. राज्य कर्जबाजारी झाले आहे. राज्यात आर्थिक बेशिस्त आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी नगरसेवक, आमदार, खासदार विरोधी पक्षाचे असले की, त्यांना विकास निधी मिळत नाही. मात्र, निवडणुकीत पराभूत झालेले आमदार किंवा खासदार सत्ताधारी पक्षाशी संबंधित असेल तर राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री भरघोस निधी देतात. हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे. सदा सरवणकर यांच्यासारखे लोक छाती पुढे करून सांगतात की, मी आमदार नसलो तरी मला 20 कोटींचा निधी मिळतो. मात्र, निवडून आलेल्या आमदारांच्या भागात अनेक कामे रखडली आहेत. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा पराभव केला, त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांना निधी देण्यात येत नाही, असा आरोपही त्यांनी केला. निधीचे असमान वाटप ही राज्यातील चिंतेची गोष्ट आहे.

मिंधे किंवा भाजपत गेलेल्या नगरसेवकांना बैठकीत बोलावून निधी दिला जातो. निवडणुका जिंकण्यासाठी हे वाटप सुरू असते. मात्र, निवडून आलेले आणि आमच्यासोबत असलेल्या नगरसेवकांना एक रुपयाचाही निधी मिळत नाही. निधी हवा असेल तर पक्षांतर करा, आमच्या गटात, आमच्या पक्षात या, असे सांगणे, हे योग्य आहे काय? मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार पुढील तीन वर्षात संपवू, अशी भाषा मुंबई भाजपच्या अध्यक्षांनी केली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात महापालिका भाजप आणि मिंधे पुरस्कृत प्रशासकांच्या ताब्यात आहे, याच काळात सर्वाधिक भ्रष्टाचार वाढला आहे. मुंबईतील अनेक भूखंड मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कोणत्या बिल्डर मित्रांना दिले, यावर मुंबई भाजप अध्यक्षांनी बोलावे. मुंबईतील एसआरए प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एकाच बिल्डरला कसे मिळतात, त्यावर त्यांनी बोलावे. भ्रष्टाचाराबाबत ते बोलतात मात्र, त्यांनी स्वतःच्या घरापासून बोलावे. आम्ही मुंबई पालिकेचा निधा 90 हजार कोटी ठेवला होता, आता तो किती शिल्लक राहिला आहे. त्याची उधळपट्टी करत कोणाला पैसे दिले? याचा हिशोब त्यांनी द्यायला हवा.

कोणीही पतंगबाजी करू नये…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात उत्तम राजकीय संवाद सुरू आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा बैठका सुरू आहेत. योग्यवेळी त्याबाबतची माहिती देण्यात येईल, तोपर्यंत कोणीही पतंग उडवू नयेत. मुंबई महापालिकेवर मराठी माणसाचा भगवा झेंडा फडकेल आणि ठाकरे ब्रँड काय आहे, हे मराठी माणूसच दाखवून देणार आहे. जागावाटपाबाबत काहीच चर्चा असल्यास ते सांगण्याचे हे व्यासपीठ नाही. योग्य वेळ येताच याबाबतची माहिती देण्यात येईल. मात्र, कोणतेही तर्कवितर्क आणि पंतगबाजी करणे योग्य नाही.

मिंधे गटाचे आरोप म्हणजे राजकारणातील हास्यजत्रा
तंत्र-मंत्र गोष्टी काही लोकांकडून करण्यात येतात आणि इतरांवर आरोप करतात, लाचार आणि लाभार्थी यांच्यावर बोलण्यात अर्थ नाही. राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा आहे. त्यांनी त्यानुसार तक्रार दाखल करावी, सर्व गोष्टी बाहेर येतील. आजही ठाण्यात तंत्र मंत्र कोणं करते? जमिनीत जिंवत बकऱ्या कोण पुरतं? कामाख्या मंदिरात जाऊन रेडे कोणे कापतं? कापलेल्या बैलांची शिंगे आणून वर्षा बंगल्यात कोण कशी पुरतं? याबाबतच्या अनेक गोष्टी उघड होतील. त्यामुळे तंत्रमंत्र याबाबतच्या गोष्टी मिंधे गटातील लोकांनी करुच नयेत. त्यांचे राजकारणच जादूटोण्यावर चालते. ते इतर लोकांवर आरोप करतात, ही राजकारणाची हास्यजत्रा आहे.