राजकीय कार्यक्रमांतून वेळ काढत सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी आता मराठवाड्याकडे लक्ष द्यावे; संजय राऊत यांची मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. आता सरकारने राजकीय कार्यक्रमातून वेळ काढत अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी येथे लक्ष देण्याची आणि येथील पूरग्रस्तांना योग्य मदत मिळण्यासाठी मंत्रिमंडळात तातडीने निर्णय घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मराठवाडा पावसाने पुराने पाण्याखाली गेला आहे. सर्वत्र हाहाकार आणि आक्रोश आहे. अनेक जिल्ह्यात पावसाने कहर माजवत थैमान घातले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत असून मोनो रेल, मेट्रो रेल याची उद्घाटने करत आहेत. राजकीय भाषणे करत आहेत, निवडणुकांची आखणी करत आहेत. त्यांचे इतर मंत्री आणि सहकारीही त्यांत व्यस्त आहेत. मात्र, आता यातून बाहेर पडून काही काळ सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

राज्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसला आहे, पूरस्थिती निर्माण झाली आहे, तिथे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. मराठवाडा हा देशाचा भाग आहे, हे समजून केंद्र सरकारनेही मोठी मदत करणे गरजेचे आहे. पंजाबमध्येही पूरस्थिती आहे. पुराच्या पाण्यात पंजाब वाहून जात आहे, अशी परिस्थिती असताना पंतप्रधानांनी पंजाबला अत्यंत तुटपुंजी मदत केली आहे. अशा प्रकारची नैसर्गिक संकटे आल्यावर गुजरातला सर्वाधिक मदत मिळते, ही लोकभावना आहे. आम्हीही या देशाचे घटक आहोत आणि पंतप्रधानही आमचेच आहेत, असे आम्ही मानतो. निजामाविरोधात लढलेला मराठवाडा हा देशाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करणे किंवा मदत नाकारणे अयोग्य आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मदत मराठवड्याला मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रावर 9 लाख कोटींचे कर्ज सरकराने केले आहे. त्यामुळे मराठवाड्याला मदत करण्यात ते किती सक्षम आहेत, याबाबत शंका आहे. त्यामुळे आता मराठवड्याला मदत पुरवण्याची जबाबादारी केंद्राची आहे.

आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदतीबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, गुराढोरांच्या चाऱ्यापाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, अनेक शाळांमध्ये पाणी शिरले, नुकसान झाले काही शाळा वाहून गेल्या आहेत, त्याची व्यवस्था झाली पाहिजे. अनेकांची घरे वाहून गेली, शेती वाहून गेली, शेतकऱ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था व्हायला हवी, अशा मागण्या त्यांनी केल्या. यात राजकारण आणू नये, सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना सहभागी करत याबाबत योग्य ते निर्णय घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकार या गंभीर प्रश्नीही राजकारण करेल, अशी आपल्याला चिंता असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित शहा ठरवतील तोच निर्णय मुंडे यांच्याबाबत होईल…
धनंजय मुंडे यांच्यावर एका विशिष्ट मुद्द्यावर आक्षेप आहे. मुंडे यांना काय काम द्यावे, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कधीही रिकामा राहत नाही, तो स्वतःच कामे काढत असतो. अजित पवार, मिंधे यांच्या पक्षाचे मालक दिल्लीत बसले आहेत. दिल्लीच्या मालकांच्या म्हणजे अमित शहा यांच्या आदेशानुसार धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदावरून दूर केले आहे. त्यात अजित पवार यांची काही भूमिका आहे, असे आपल्याला वाटत नाही. त्यांचे पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, तेच सर्व ठरवतात. त्यामुळे मुंडे यांचे काय करायचे, त्यांना काय काम द्यायचे, हे दिल्लीतून ठरेल, असे आपल्याला वाचते, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.