
मला भाजपची चिंता नाहीये. माझं सर्व काढून घेतलं. तरीही त्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटते. माझ्याकडे काही नाही. पक्ष नाही, चिन्ह नाही. सर्व तुम्हाला दिलं. तरी तुम्हाला माझी भीती का वाटते. माझ्याकडे काही नाही, पण कार्यकर्ते सोबत आहे. हीच माझी ताकद आहे, आणि मी शिवसेना हे नाव घेणार, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. अमरावती येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
उद्याची निवडणूक वातावरणावर जिंकायची नाही. मला खरं खोटं करून जिंकायची आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा. या सरकारच्या योजना कशा फसव्या आहेत. हे लोकांना जाऊन सांगा. त्यांना माहिती द्या, असं आवाहन त्यांनी केलं.
सर्वांना एक दिवस जावेच लागणार आहे. पण पाठी काय पाऊलखुणा ठेवणार? ज्या पाऊलखुणा टाकता ते वाईट आहे. पूर्वी मतपेटीतून सरकार यायचं आता खोक्यातून येतं. उद्या दाऊद येऊन पैशाच्या जोरावर सरकार स्थापन करेल. पंतप्रधान बसवतील, हा पायंडा मोडायचा आहे, असं आवाहन त्यांनी केलं. जमीन माझी आहे. गद्दारीचं तण उपटून टाका. ज्यांना जायचं त्यांनी जा. गंगा मलीन केली, तशी शिवसेना मलीन करायची नाहीये, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
“संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्रमांक एकचे पंतप्रधान आहेत. मग तरीही तुम्हाला इतर पक्ष फोडण्याची गरज का लागते? जे आपलं आहे ते विकायचं आणि दुसऱ्याचं चोरायचं ही वेळ भाजपवर का आली?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. पण तसा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या. तुमचे दोन खासदार होते, रस्त्यात तुम्हाला कोण विचारत नव्हतं, तेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या आदेशावरून शिवसैनिकांनी तुम्हाला महाराष्ट्र फिरवला होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही 25 वर्षे तुमच्या सोबत राहिलो. आता तुम्ही आम्हाला संपवायला निघाला आहात, ही तुमची नीतिमत्ता आणि हे तुमचं हिंदुत्व आहे?” असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
“मोदींच्या मागे त्यावेळेस बाळासाहेब उभे राहिले नसते तर आता त्यांचं नाव यादीत असतं का? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारायला हवा. त्यांच्यातले उपरे दलाल सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटले आहेत. मात्र मला एक मराठी माणूस दाखवा जो दुसऱ्या राज्यात जाऊन तिथल्या लोकांवर दादागिरी करत असेल. भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेले आहात, त्यांच्याकडून तुम्ही राखी बांधून घेत आहात. मग आता त्यांच्यावरील आरोप खोटे होते? की तुमच्याकडे आले म्हणून त्यांना गोमूत्र शिंपडून स्वच्छ केलत? हे तरी सांगा. त्यांच्या चौकश्या का थांबल्या? मला महाराष्ट्रातली जनता कुटुंबप्रमुख मानते हेच त्यांच्या पोटात दुखतंय.” असे यावेळी ठाकरे म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, मेळघाटात नवजात अर्भकांना वाचवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात आले. सत्ता नसताना आम्ही हे करू शकतो, मग तुमच्याकडे खोके असूनही तुम्ही त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यांच्यासाठी काही केलत तर तुम्हाला कोणाला विकत घ्यायची गरजच भासणार नाही.”
“काही बोगस लोकं म्हणतात की मी मतांची भीक मागायला आलो आहे. हो मी मतांची भीक मागतो, कारण मी मतदाराला राजा मानतो. बोगस सर्टिफिकेटवर पैसे देऊन मत देणारा गुलाम मानत नाही. आजची गर्दी आणि उत्साह पाहता त्यांना सलाईन लावण्याची वेळ आली असेल. खरंतर आजची जागा चुकली, कारण कार्यकर्त्यांचा मेळावा हा चार भिंतींमध्ये होऊ शकत नाही. काल पोहरा देवीच्या इथे देखील सभाच झाली. काल दिग्रसपासून इथे येताना कित्येक माता भगिनी अबाल वृद्ध माझी वाट बघत होते. माझ्या हातात काही नसताना तुम्ही माझ्या सोबत राहिलात, मग मी तुम्हाला देव नाही मानायचं तर अजून काय मानायचं? खुर्चीत बसलेल्या माणसाच्या नशिबी जे भाग्य नाही ते भाग्य माझ्या नशिबी आहे.” असे ते म्हणाले.
“मी घरी बसून होतो पण मी कोणाची घर फोडत नव्हतो. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही. त्यांना कोण दारात उभच करत नाही, म्हणून त्यांना सरकार आपल्या दारी म्हणत सगळीकडे जावं लागतय. या कार्यक्रमांना पोलीस डॉक्टर आणि अंगणवाडी सेविकांना सध्या वेशात बसवलं जातंय.” असे ठाकरे म्हणाले.

























































