
रत्नागिरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. या निवडणूकीत शिवसेनेचे उत्तम सावंत बिनविरोध विजयी झाले. विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला.
कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर दत्तात्रय मयेकर यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. शिवसेनेकडून उत्तम सावंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. उत्तम सावंत यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत जाधव यांनी उत्तम सावंत बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले.
विजयानंतर सभापती संजना माने यांनी उपसभापती उत्तम सावंत यांचे अभिनंदन केले. यावेळी गटनेते उत्तम मोरे, माजी सभापती मेघना पाष्टे, विभांजली पाटील, प्राजक्ता पाटील, माजी उपसभापती सुनील नवले, दत्तात्रय मयेकर, शंकर सोनवडकर, गजानन पाटील, अभय खेडेकर, जयश्री जोशी, प्राची रावणंग, राजेश जाधव, सरपंच ऋषीकेश भोंगले आणि इतर सदस्य उपस्थित होते.
उत्तम सावंत हे पाली पंचायत समिती गणातून विजयी झाले आहेत. विजयानंतर उत्तम सावंत म्हणाले की, शिवसेनेमुळे आज माझ्यासारख्या मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तीला उपसभापतीपद मिळाले. मला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, उद्योजक रवींद्र सामंत, किरण सामंत यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. मला मिळालेल्या संधीचे मी निश्चितच सोने करीन. विकासकामांसाठी पाठपुरावा करावा लागेल तो मी सातत्याने करीन. आयुष्यात कधी मी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी पंचायत समिती सदस्य होईन. आता तर मला उपसभापती पदाचा सन्मान मिळाला आहे. हा सन्मान मला शिवसेनेमुळेच मिळाला आहे, असे सावंत यांनी सांगितले.



























































