
एका शिक्षकाने शिक्षिका असलेल्या पत्नीचा व पाच वर्षांच्या मुलाची हत्या करून आत्महत्या केली. ही घटना बार्शी शहरातील नाईकवाडी प्लॉटमध्ये घडली. याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, खुनाचे कारण अद्यापि अस्पष्ट आहे.
तृप्ती अतुल मुंढे (वय 35), ओम मुंढे (वय 5) असे खून झालेल्यांची नावे असून अतुल सुमंत मुंढे (वय 40, सर्व रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी) आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
बार्शी शहरातील उपळाई रोडवर असलेल्या नाईकवाडी प्लॉटमध्ये अतुल मुंढे यांचे दुमजली घर आहे. त्यांची पत्नी तृप्ती मुंढे या शहरातीलच एका शाळेत शिक्षिका असून, त्यांना ओम नावाचा पाच वर्षांचा मुलगा आहे. मुंढे हे पत्नी व मुलासह वरच्या मजल्यावर राहात होते, तर तळमजल्यावर आई-वडील राहतात. मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास अतुल मुंढे याने पत्नीचा गळा चिरून अंगावर चार-पाच वार करत त्यांचा खून केला. यावेळी त्यांना ओम हा सोडविण्यास आला असता, मुलाच्या तोंडावर उशी ठेवून त्याची हत्या केली. पत्नी व मुलाच्या हत्येनंतर अतुल मुंढेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी शाळेला जाण्यासाठी नातू खाली न आल्याने त्याचे आजी-आजोबा वर पाहण्यास गेले असता सदरची धक्कादायक घटना दिसून आली. या घटनेमुळे बार्शी शहरात खळबळ उडाली असून, नाईकवाडी प्लॉटमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेने अतुलच्या आई-वडील व नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे. हत्या व आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. बार्शी शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.




























































