
लातूर शहरातील रिंगरोड कन्हेरी भागातील पंचमुखी हनुमान मंदिराच्या परिसरात एका तरुणाने केलेल्या गोळीबारात एकजण जखमी झाला. या प्रकरणी विवेकांनद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये लातूर शहरात तरुणांच्या गुन्हेगारीने खळबळ उडवून दिली आहे.
लातूर शहर शांत आणि सुरक्षित समजले जात होते. राज्यभरातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत, मात्र तरुणांच्या टोळ्या सध्या कार्यरत झालेल्या असून रस्त्यावर हाणामारीच्या घटना घडत आहेत. परवाच भर रस्त्यात तरुणाच्या डोक्यात रॉड घालून दोघांना जखमी केल्याची घटना घडली होती. त्याच दिवशी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास चाकून भोसकून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. तर आता थेट गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे.
कन्हेरी रिंगरोड भागातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असणाऱ्या मोकळ्या मैदानात काल साडेचार वाजण्याच्या सुमारास तरुणांच्या दोन गटांत वादावादी सुरू होती. अचानक अमित राठोड रा.कन्हेरी तांडा या युवकाने पिस्तुलातून गोळी झाडली. देवानंद जीवनराव पाटील याच्या हाताला गोळी लागली. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जी.बी. मानुल्ला हे करीत आहेत.

























































