
महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. नवीन वीज जोडण्या देण्याबरोबरच बिघाड झालेले मीटर बदलण्यासाठी महावितरणला महिन्याला सुमारे दीड-दोन लाख वीज मीटर लागतात. मात्र सध्या महावितरणच्या सर्व परिमंडळ कार्यालयात दोन ते अडीच लाख वीज मीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे नवीन वीज जोडण्या देण्यावर मर्यादा येत आहेत. तसेच बिघाड झालेलेल मीटर वेळेत बदलून मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
राज्याच्या कानाकोपऱयात अडीच कोटी ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवली जात असून दरवर्षी सुमारे आठ लाखांहून अधिक नवीन वीज जोडण्या दिल्या जातात. तर चार-पाच लाख मीटर रिप्लेसमेंटसाठी लागतात. मात्र कोरोना महामारीपासून महावितरणला वीज मीटरच्या तुटवडय़ाचे ग्रहण लागले असून ते अद्याप संपलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर महावितरणने नुकतीच 15 लाख मीटरच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. त्यापैकी एप्रिल महिन्यात एक लाख, तर चालू महिन्यात दीड लाख मीटर उपलब्ध झाले आहेत. मात्र गेल्या सात-आठ महिन्यांपासून वीज मीटरचा तुटवडा असल्याने नवीन कनेक्शनच्या आणि मीटर बदलण्यासाठी अर्ज केलेल्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. मात्र महावितरणच्या कार्यालयातच पुरेसे मीटर नसल्याने नवीन ग्राहकांना कनेक्शन कधी मिळणार, नादुरुस्त मीटर कधी बदलणार, असा सवाल महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे.
कर्मचाऱयांकडून वेळ मारून नेण्याचे काम सुरू
नादुरुस्त झालेला वीज मीटर बदलण्यासाठी ग्राहकाने अर्ज केला असता वीज कर्मचाऱयांकडून तो बदलण्यास टाळले जात आहे. आम्ही तुमचा मीटर आधी तपासून बघू, त्यानंतरच बदलून देऊ असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी आहे.




























































