‘श्रावण महोत्सव 2019’ : आज महाअंतिम फेरी

2756

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पार पडलेल्या प्राथमिक फेरीत सहभागी स्पर्धकांचा लकी ड्रॉ काढण्यात आला आणि विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट करण्यात आली.  त्यासाठी   प्रायोजक ब्रॅण्ड्सच्या स्टॉलवर महिलांनी लकी ड्रॉचा फॉर्म भरून देण्यासाठी रांगा लावल्या.

‘श्रावण महोत्सव 2019’ स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई व परिसरात एकूण 11 ठिकाणी स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली असून सोमवार, 26 ऑगस्टला दुपारी 2.30 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. महाअंतिम फेरीत मुख्य परीक्षक म्हणून हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत असणार आहेत.

महाअंतिम सोहळ्यात गायक नचिकेत देसाई आणि अनुजा वर्तक रसिकांना गाण्याच्या माध्यमातून श्रावणाचा मनमुराद आनंद देणार आहेत. तसेच यावेळी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ सातासमुद्रापार नेण्याचा विडा उचलणाऱया पूर्णब्रह्मच्या जयंती कठाळे प्रेक्षकांना भेटायला, त्यांच्याशी संवाद साधायला उपस्थित राहणार असून त्या व्यवसाय क्षेत्रातील स्वतःची यशोगाथा प्रेक्षकांसमोर उलगडणार आहेत. आता या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रंगणार असून खाद्य परंपरेबरोबरच श्रावणातील गाणी, शेफच्या टीप्स, धम्माल खेळ आणि बक्षिसांची लयलूट करण्याची संधी स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांनादेखील मिळणार आहे.

विजेत्या स्पर्धकाला थायलंडची सफर

विजेत्याव्यतिरिक्त उपस्थित प्रेक्षकांनाही विविध खेळांच्या माध्यमातून महाअंतिम फेरीत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच विजेत्या स्पर्धकाला केसरी टूर्सतर्फे ‘माय फेअर लेडी’ या थायलंडच्या टूरला जाण्याची संधी मिळणार आहे.

  • स्थळ : रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी
  • वेळ: दुपारी 2.30 वाजता

लज्जतदार सोहळा

‘हसरा नाचरा, जरासा लाजरा’ श्रावण महिना सुरू झाला की तमाम गृहिणींना प्रतीक्षा असते ती श्रावण महोत्सवाची. श्रावण महिना आणि श्रावण महोत्सव हे समीकरण गेल्या चार वर्षांपासून जुळून आले आहे. उत्सक पाककलेचा… उत्सक खाद्यसंस्कृतीचा अशी ओळख असलेल्या उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन्सचा श्रावण महोत्सव 2019 चा सोहळा 1 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात रंगला. ठाणे, ताडदेव, डोंबिवली, गोरेगाव, वसई, खारघर, चेंबूर, दहिसर, विलेपार्ले, बदलापूर, दादर अशा 11 ठिकाणी श्रावण महोत्सवाची प्राथमिक फेरी पार पडली. यंदाच्या स्पर्धेत केवळ महिलाच नव्हेत तर पुरुष स्पर्धकही सहभागी झाले. सर्वच सेंटरवर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. हजारो स्पर्धकांनी प्राथमिक फेरीत भाग घेतला. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहेत.

भन्नाट पराठे आणि थेपले

मिश्र पिठांचा पराठा, दोडक्यांच्या सालीचा पराठा, भाज्यांच्या देठांचा पराठा, रानभाज्यांचा पराठा, कारलं- बटाटा पराठा अशा भन्नाट आयडिया वापरून पराठे- थेपले तयार करण्यात आले. महिलांनी कल्पकता वापरून नावीन्यपूर्ण पदार्थ सादर केले. परीक्षकांच्या एका पॅनेलनेही प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. यामध्ये शिवानी नेमावरकर, डॉ. मानसी, डॉ. रुचा, स्मिता सरजोशी, मनीषा मराठे, कला जोशी, शुभांगी देवचके, स्वाती जोशी, विजय कामेरकर, श्रीया जोशी, पराग बापट यांचा समावेश होता.

तुडुंब गर्दी, उत्साह आणि कौतुक

घरच्या मास्टर शेफला हक्काचा मंच मिळवून देण्याचे काम श्रावण महोत्सव स्पर्धा करीत आहे. गृहिणींचा आत्मविश्वास वाढवणारी ही स्पर्धा आहे. प्रत्येक केंद्रावर तुडुंब गर्दीत प्राथमिक फेरी पार पडली. निवेदक विनित देव याच्या खुमासदार निवेदनाने महोत्सवाची रंगत वाढवली. विविध खेळ तसेच लकी ड्रॉमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. टाळ्या, हशा, कौतुक असा माहौल प्रत्येक केंद्रावर दिसून आला. प्रत्येक केंद्रावर स्पर्धकांनी दर्जेदार पाककृती सादर केल्या. त्यामुळे पाच विजेत्यांची निवड करणे हे परीक्षकांसमोर आव्हान होते.  यंदा प्रथमच पुरुषांसाठीही ही स्पर्धा खुली करण्यात आली. काही केंद्रांवर पुरुषांचा सहभाग दिसून आला. दादर केंद्रावर वंदना कर्वे यांच्या आव्हान पालक संघाच्या ‘स्पेशल’ मुलांनी स्पर्धेत भाग घेतला. केवळ पदार्थाची चव किंवा सजावट नव्हे तर पदार्थातील पौष्टिकतेच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली, तर काही स्पर्धकांना उत्तेजनार्थ  पारितोषिके देण्यात आली.

प्राथमिक फेरीचे मुख्य परीक्षक शेफ तुषार प्रीती देशमुख, न्युट्रीशनिस्ट नमिता नानल आणि उत्तरा मोने होते. नमिता नानल यांनी पदार्थ करताना त्यातील पौष्टिकता कशी टिकून राहील, भाज्यांमधील जीवनसत्व कशी अबाधित राहतील, याबाबत स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेचा उद्देश

हल्लीची मुले जंकफूड आवडीने खातात, घरचे जेवण खायला मुलं टंगळमंगळ करतात. मात्र चांगली चव, पौष्टिकता असलेले पारंपरिक पदार्थ जर नावीन्यपूर्ण पद्धतीने मुलांना खायला दिले आणि ते खाण्याची मुलांना सवय लावली, तर मुले ते पदार्थही चवीने खातील. स्पर्धेच्या निमित्ताने मुलांना गोडी लागावी आणि महिलांच्या पाककलेच्या कल्पकतेला चालना मिळावी, हा स्पर्धेमागील हेतू आहे.

बक्षिसांचा वर्षाव

प्रत्येक केंद्रावर निवडून आलेल्या स्पर्धकांना, तसेच विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पीतांबरी, तन्वी हर्बल, व्हॉयला फॅशन ज्वेलरी, विको, एनकेजीएसबी बँक, आस्वाद, फॅमिली स्टोअर्स, पूर्णब्रह्म, सरोज स्वीटस् या दर्जेदार ब्रॅण्ड्सतर्फे गिफ्ट हॅम्पर्स, माधवबागतर्फे फ्री कुपन्स, एस्सेलवर्ल्डचे फ्री पासेस देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या