काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना 200 टक्के पगारवाढ, कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांत मोठी सुधारणा

उत्तर प्रदेश सरकारने श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टच्या पुजारी आणि कर्मचाऱयांसाठी नवीन सेवा नियमांना मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, मंदिरातील पुजारी व कर्मचाऱयांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱयांचा दर्जा मिळेल आणि त्यांच्या पगारातही लक्षणीय वाढ होईल. पुजाऱयांना 200 टक्के पगारवाढ होईल. पुजाऱयांचे मासिक वेतन, जे आतापर्यंत सुमारे 30 हजार रुपये, ते आता नवीन नियमांनुसार जवळ जवळ तिप्पट होईल. गेल्या 40 वर्षांतील पुजाऱयांच्या सेवा नियमांत ही पहिली मोठी सुधारणा आहे.

काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्व भूषण मिश्रा म्हणाले, ‘मंदिराचे पुजारी पूर्वी कोणत्याही औपचारिक चौकटीशिवाय काम करत होते. आमच्या पुजाऱयांना पूर्वी कोणतेही सेवा नियम नव्हते. आता नियमांसह कराराला ट्रस्टने मान्यता दिली आहे. जर सरकारने सहमती दर्शवली, तर जे पुजारी हे स्वीकारून यावर स्वाक्षरी करतील त्यांना सुधारित सेवा आणि लाभ मिळतील. देशातील मंदिरांमध्ये काम करणाऱया पुजाऱयांसाठी अनुक्रमे सर्वोत्तम वेतन आणि लाभ देणे हे उद्दिष्ट आहे.’

नुकत्याच पार पडलेल्या 108 व्या बैठकीत, श्री काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टने इतर अनेक प्रस्तावांना मान्यता दिली. यामध्ये पारंपरिक शिक्षणाला चालना देण्यासाठी मिर्झापूरमधील काक्राही येथे मंदिराच्या 46 एकर जमिनीवर वैदिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करणे याचा समावेश आहे. याशिवाय भाविकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी काशी विश्वनाथ धाम आणि शक्तीपीठ विशालाक्षी माता मंदिरदरम्यान थेट मार्ग तयार करण्यासाठी इमारती खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.