
हैदराबादचा पहिला निजाम श्रीमहाराजांचा भक्त होता. त्याच्या मृत्यूनंतर गादीवर विराजमान झालेल्या दुसऱ्या निजामाने मात्र दिवाणाकरवी श्रीमहाराजांचा अपमान करून त्यांना घालवून दिले. तेव्हा श्रीमहाराज तिथून बाहेर पडले आणि गावाबाहेर नदीकिनारी गेले तोच एकाएकी वादळ सुरू झाले. नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. गावात पाणी शिरू लागल्याने निजाम घाबरला. त्याला आपली चूक कळली.
निजाम गावाबाहेर गेला. घडल्या प्रकाराबद्दल क्षमायाचना करीत त्याने श्रीमहाराजांना वाजतगाजत राजवाडय़ात आणले व राजसिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. श्रीमहाराजांनी सांगितल्यानुसार निजामाने नदीची खणानारळाने ओटी भरली असता पाणी ओसरले. श्रीमहाराज निजामाला म्हणाले, ‘गुरुचरित्रात वर्णिलेला धोबी तू आहेस. मीच तुला राज्य दिले अन् तू मला विसरलास? तुझे वैभव आणि तुझे राज्य लयाला जाणार आहे. मी तुला वाचवण्यासाठी आलो होतो पण आता ते होणे शक्य नाही.’ असे सांगून श्रीमहाराज तेथून निघाले.
बऱहाणपूरच्या वैदिक शास्त्रीबुवांना मुलेबाळे नव्हती. श्रीमहाराजांना जेव्हा हे वृत्त कळले, तेव्हा ते शास्त्रीबुवांना घेऊन गावाबाहेर गेले. शास्त्रीबुवा चालून थकले तेव्हा त्यांना चहाबिडीची तलफ लागली म्हणून श्रीमहाराज एका डोंगराजवळ थांबले आणि त्यांनी टाळी वाजविली तेव्हा एक मुलगा चहा, बिडीचे बंडल व आगपेटी घेऊन आला. दोनजणांना पुरेल इतका चहा तसेच दोन कपबश्याही होत्या. शास्त्रीबुवांनी चहा घेतला तरीही त्यांना आणखी चहा हवा होता. हे पाहून श्रीमहाराज त्या मुलाला म्हणाले, ‘शास्त्रीबुवांना पाहिजे तेवढा अमृततुल्य चहा दे.’ शास्त्रीबुवांनी तीन कप चहा घेतला नंतर बिडीदेखील घेतली. जंगलात आपोआप चहा व बिडी येणे हा चमत्कार श्रीमहाराजांच्या कृपेने घडला होता मात्र बुवांना त्याची जाणीवच झाली नाही. शास्त्रीबुवांनी तीन चहा (पुल्लिंगी) आणि एक बिडी (स्त्रीलिंगी) घेतली होती या कारणाने त्यांना पुढे तीन मुलगे आणि एक मुलगी झाली असे ‘श्रीशंकरगीता’ ग्रंथाचे रचयिता अघोरशास्त्री नमूद करतात.
श्रीक्षेत्र काशी येथे मुक्कामास असतेवेळी श्रीमहाराज एकदा श्रीकाशीविश्वेश्वराच्या मंदिरात गेले. गाभाऱ्यात जातेवेळी त्यांनी पायातील बूट न उतरविल्यामुळे पुजाऱ्यांना राग आला. त्यांनी श्रीमहाराजांना हाकलून दिले तसे ते निघून गेले मात्र ते पुजारी मंदिरात गेले असता त्यांना मंदिर गरागरा फिरू लागल्याचे लक्षात आले व ते घाबरले. गाभाऱ्यामध्ये बूट घालून आलेल्या व्यक्तीला आपण हाकलून दिले त्याचा हा परिणाम असल्याचे पुजाऱ्यांच्या लक्षात आले. त्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या पुजाऱ्यांना श्रीमहाराज होडीत बसल्याचे दिसून आले. पुजाऱ्यांनी श्रीमहाराजांची क्षमा मागितली तेव्हा श्रीमहाराज त्यांना, ‘परत मंदिरात जा’ असे म्हणाले. पुजारी मंदिरात गेले तेव्हा मंदिराचे फिरणे थांबले होते. पुढे त्या पुजाऱ्यांनी आधी श्रीमहाराजांची पूजा केली अन् त्यानंतर श्रीकाशीविश्वेश्वराची. हा उपक्रम पुढे महिनाभर चालला होता.
श्रीमहाराजांकडे तऱहेतऱहेचे लोक येत असत. अमली पदार्थांचे सेवन करणारे, अभक्ष्य भक्षण करणारे आणि दुराचारी लोकही त्यामध्ये असत मात्र, त्यांना अन्य भक्तमंडळी दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असत. हे पाहून श्रीमहाराज त्या मंडळींना जवळ बोलावून सांगत की, ‘कुणी कुणाला पापी वा दुराचारी म्हणणे योग्य नाही. सातत्याने अपयश किंवा दुःख वाटय़ाला येत राहिल्यामुळे काही माणसे व्यसनांच्या अधीन होतात म्हणून, सर्वप्रथम त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे. त्यांचे दुःख दूर झाले तर त्यांची व्यसनेही नाहीशी होतील.’
व्यसनाधीन माणसांचीही श्रीमहाराज प्रेमाने विचारपूस करीत असत आणि त्याला परमार्थाचा योग्य तो मार्ग दाखवून सांगत असत की, ‘कुणाच्याही दुर्गुणांचा पाढा वाचून दाखविणे योग्य नाही. दुसऱ्याचे दुर्गुण दूर करता आले तर तसा प्रयत्न करावा. त्याच्या दुर्गुणांबद्दल निंदा करून आपली शांती व्यर्थ दवडणे योग्य नाही. आपल्यातील शक्तीचा सदुपयोग केला तरच चांगले काहीतरी घडेल. म्हणून, आपल्या संपर्कात येणाऱ्याचे नेहमी सद्गुण पाहावेत आणि त्याच्यातील दुर्गुण हळुवारपणे व प्रेमाने दूर करण्याचा प्रयत्न करावा.’






























































