श्रीगोंद्यात दरोडेखोरांच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश, पाच जिल्ह्यांमधील तब्बल 26 गुन्हे उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांत रस्तेलूट, घरफोडय़ांसारखे गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱया सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश श्रीगोंदा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली असून, चारजण फरार झाले आहेत. त्यांच्याकडून दरोडय़ाच्या साहित्यासह दोन दुचाकी असा 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गहिनीनाथ उर्फ ईश्वऱया भोसले (वय 32) व सोन्या उर्फ लाल्या ईश्वऱया भोसले (वय 28, दोघेही रा. बेलगाव ता. कर्जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काही दरोडेखोर नगर-सोलापूर महामार्गालगत असणाऱया मांडवगण फाटय़ापासून बनपिंप्री येथील रस्त्यावर दरोडय़ाच्या तयारीत असल्याची माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक ढिकले यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुनील सूर्यवंशी व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कारवाई करण्यास सांगितले.

पथकाने सायंकाळी 7 वाजता छापा टाकला असता सहा व्यक्ती तेथे असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहून त्यांनी पोबारा केला. मात्र, गहिनीनाथ उर्फ ईश्वऱया भोसले व सोन्या उर्फ लाल्या ईश्वऱया भोसले या दोघांना पाठलाग करून पकडण्यात यश आले, तर चौघे फरार झाले. त्यांच्याकडून दोन दुचाकी, मिरची पूड, पान्हे, कटावणी, चाकू व रोख रक्कम मिळून असा 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या दोन्ही गुन्हेगारांविरोधात नगर, सोलापूर, पुणे, बीड, धाराशिव जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांत दरोडे, घरफोडी, रस्तालूट असे तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. त्यात ते फरार होते. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक अमित माळी व हवालदार वैभव गांगर्डे तपास करीत आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक सुनील सूर्यवंशी, उपनिरीक्षक अंकुश ढवळे, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, दादासाहेब टाके, दीपाली भंडलकर, प्रशांत राठोड यांनी ही कारवाई केली आहे.